मुख्यमंत्र्यांऐवजी परिवहनमंत्र्यांशी मराठा मोर्चा आंदोलकांची चर्चा

कृष्ण जोशी
Saturday, 7 November 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याबाबत ठाम असलेल्या मराठा क्रांती मोर्चा मधील आंदोलकांनी अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवल्या. 

मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याबाबत ठाम असलेल्या मराठा क्रांती मोर्चा मधील आंदोलकांनी अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवल्या. 

मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात शेवटचा इशारा म्हणून काढलेल्या मराठा क्रांती मोर्चा चे स्वयंसेवक आज रात्रीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ठाम होते. तर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्याची वेळ दिल्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण अखेर सध्या परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करण्याचा तोडगा निघाला.

हेही वाचा - राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण सूचना

मराठा समाजाच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा तर्फे वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडो नागरिक मशाली घेऊन सहभागी झाले होते. रात्री आठच्या सुमारास मशाल मोर्चा संपला तरी मुख्यमंत्र्यांची लगेच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत मोर्चेकरी आग्रही होते. आजच शिष्टमंडळ घेऊन मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटायचे असा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा इरादा होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्याची वेळ दिल्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांची आजच भेट घ्यावी असा ठाम आग्रह मोर्चेकऱ्यांचा होता. मात्र पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मातोश्री मध्ये जाण्यास मनाई केली. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानात बसवून ठेवले होते. वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी तेथे येऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण मोर्चेकरीही आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांना आंदोलकांची भेट घेण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार शिष्टमंडळाने आपल्या मागण्या त्यांच्या  कानावर घातल्या. 

हेही वाचा  - फेक टीआरपी प्रकरण! "हंसा'ने पोलिसांवर केलेल्या आरोपांचा खुलासा करा

यावेळी शिष्टमंडळाने पुढील प्रमुख मागण्या परब यांच्यासमोर ठेवल्या. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती बरखास्त करून नव्या समितीवर अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे वा अजितदादा पवार यांची नियुक्ती करावी, न्यायालयीन लढ्याबाबत त्वरेने निर्णय घ्यावेत, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठ स्थापन होण्यासाठी य प्रयत्न करावेत, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांना वेगळ्या मार्गाने आरक्षण द्यावे तसेच अन्य पात्रता अटी शिथील कराव्यात, मराठा विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षात नुकसान होऊ नये यासाठी त्यांना प्रवेशात सवलती मिळाव्यात, मेडिकलच्या प्रवेशात मराठा मुलांना स्थान मिळण्यासाठी 12 नोव्हेंबरची अंतिम तारीख वाढवावी, नोकऱ्या व अन्य शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांबाबतही सुयोग्य निर्णय घ्यावेत, रायगड जिल्ह्यातील तांबडी (ता. रोहा) तसेच दोंडाईचा, हिंगणघाट येथील पीडितांच्या कुटूंबियांना न्याय देऊन आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion of Maratha Morcha protesters with the Transport Minister instead of the Chief Minister