
Mumbai News : शिवकालीन शौर्यशाली युद्धांच्या यशोगाथा दाखवणाऱ्या शस्त्रांचे गेट वे वर प्रदर्शन
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दिव्य गाभाऱ्यात ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या पुढाकाराने व डॉ. तेजस गर्गे, संचालक- पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या आराखड्यानुसार प्रथमच जागतिक वारसा स्थळ - गेटवे ऑफ इंडियाच्या अद्वितीय गाभान्यात दिमाखदार प्रदर्शन पर्यटकांना भुरळ घालत आहे.

शिवकालीन शस्त्रे हा तसा प्रत्येकाच्या औत्सुक्याचा विषय या शस्त्राच्या निर्मितीचे तंत्र आणि ती कोणासाठी व कोणत्या प्रयोजनासाठी निर्मिली गेली, याचेही काही संदर्भ आहेत. म्हणजे, राजाची शस्त्रास्त्रे वेगळी. राणीची वेगळी अन् राजकुमाराची लहान आकारातील शस्त्रास्त्रे वेगळी. एवढेच नव्हे तर, योध्यांकडून युद्धावेळी वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे तुलनेत मजबूत स्वरूपाची पूर्णत: वेगळी असत.
नजराणा म्हणून सन्मानपूर्वक दिली जाणारी नक्षीदार शस्त्रास्त्रे वेगळ्या धाटणीची असत. ही सर्व वैविध्यपूर्ण शस्त्रास्त्रे पाहतानाच त्यांच्या अनोख्या इतिहासाचा पट शस्त्र संग्रह आणि अभ्यासक निलेश अरुण सकट आणि क्युरेटर डॉ. आदिती निखिल वैद्य यांच्या कडून उलगडलाआहे.
या प्रदर्शनात वाघनखे, धनुष्य-बाण, तलवारी, चिलखत, भाले, कटयार, जांबिया, खंजीर, बिचवे, गुर्ज, तोफांचे गोळे, पट्टा, चिलखत यासारख्या शस्त्रास्त्रांचे विविध प्रकार एकाच ठिकाणी पहाता येतील. पुरातन काळात जगातलया प्रमुख पाच शस्त्र परंपरामध्ये भारतीय शस्त्र परंपरा एक होती. भारतीय शस्त्र परंपरेतही राजपूत, मराठा, मोगल यांच्या शस्त्रास्त्रांची रचना पूर्णत: वेगळी असे या प्रदर्शनात तलवारीचे विविध प्रकार अन् त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेता येतील.
तीन फुटी वक्राकार समशेर, चार फुटी लांब सरळ असणारी तलवार म्हणजे मराठा धोप, राजपुत पद्धतीची वरच्या बाजूला किंचितशी मोठी होत जाणारी दुधारी तलवार म्हणजे खांडा, हत्तीचा पाय तोडण्यासाठी वापरली जाणारी तबर (कुन्हाड), कटारींचे प्रकार, लहान छुपी शस्त्रे पर्यटकांना बघायला मिळत आहे. या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत अत्युच्च दर्जाच्या पोलादाचा वापर केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रदर्शनाचे व्यवस्थापन चेतन बाविस्कर यांनी केले आहे.