घराच्या बांधकामावरून दोघा शेजाऱ्यांमध्ये वाद; घरात घुसून प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murderer Attack

घराचे बांधकाम आणि पायवाट यावरुन झालेल्या वादातून दोघा शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून तरुणावर त्याच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Crime News : घराच्या बांधकामावरून दोघा शेजाऱ्यांमध्ये वाद; घरात घुसून प्राणघातक हल्ला

डोंबिवली - घराचे बांधकाम आणि पायवाट यावरुन झालेल्या वादातून दोघा शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून विशेष मिरकुटे (वय 32) या तरुणावर त्याच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना कल्याण पश्चिमेतील बारावे गावात ही घटना घडली आहे. मारहाणीची ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात महेंद्र देसाईकर, वेसुबाई देसाईकर, पिंकी मिरकूटे व अपर्णा देसाईकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बारावे गावात विशेष मिरकुटे हे परिवारासह राहतात. त्यांच्या शेजारी महेंद्र देसाईकर हे राहण्यास असून घराच्या बांधकामावरून देसाईकर आणि मिरकुटे यांच्या परिवारात वाद झाला होता. अनधिकृत बांधकाम करीत असल्याचा आरोप मिरकुटे यांनी केला आहे. यावरून 18 नोव्हेंबरला रात्री 8 च्या सुमारास विशेष हे घरात असताना महेंद्र हा घरात आला आणि एका धारदार शस्त्राने विशेष यांच्या डोक्यावर त्याने वार केला.

रक्तबंबाळ झालेल्या विशेषने बचावासाठी घराबाहेर धाव घेतली असता महेंद्र याच्या पाठीमागे त्याच्या कुटूंबातील यसुबाई, पिंकी व अपर्णा या देखील विशेष यांच्या घरात आल्या होत्या. यावेळी दोघांच्या परिवारातील महिलांमध्येही हाणामारी झाली. विशेष यांनी तेथून पळ काढत थेट खडकपाडा पोलिस स्टेशन गाठले. त्यांना उपचारासाठी प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालय येथे हलविले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर कळवा येथील रुग्णालयात विशेष यांना उपचारासाठी हलविण्यात येणार होते.

विशेष यांचा भाऊ आषिष याने त्यांना मिरा रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दरम्यान विशेष याने खडकपाडा पोलिस ठाण्यात महेंद्र व त्यांच्या कुटूंबियांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून त्याआधारे पोलिस तपास करत आहेत.