वसईत पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वादात 'जनता गेली खड्डयांत'; रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक हैराण

संदीप पंडित
Saturday, 29 August 2020

शहरातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्याकड़े केवळ सहा रस्ते असल्याचे सांगून पालिकेच्या आरोपाचा चेंडू पुन्हा त्यांच्याच कोर्टात टोलवला आहे

विरार - दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे झाल्यावर महानगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात लुटुपुटुची लढाई सुरु होते आणि खड्डे भरण्याची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरु होते यावर्षीदेखील वसई-विरार महापालिकेने वसई-विरार शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात पाऊस बाधा आणत असल्याचे कारण पुढे करून; शहरातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्याकड़े केवळ सहा रस्ते असल्याचे सांगून पालिकेच्या आरोपाचा चेंडू पुन्हा त्यांच्याच कोर्टात टोलवला आहे.

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्याकडील रस्त्याची यादी किलोमीटरसह सादर केली आहे. त्यामुळे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वादात 'जनता गेली खड्डयांत' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.वसई-विरार महापालिका प्रभाग 'सी'मधील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर सहसचिव महेश कदम यांनी पालिकेला पत्र दिले होते.या पत्राला उत्तर देताना पालिकेने प्रभाग 'सी'मधील रस्ते गणेश आगमनापूर्वी खड़ी, ग्रिड टाकून बुजवण्यात येत होते. मात्र आतिवृष्टिमुळे या कामात बाधा आल्याचे म्हटले आहे. पाऊस ओसरताच हे काम करण्यात येईल, असा खुलासाही पालिकेने केला होता.

मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ

विशेष म्हणजे वसई-विरार शहराला जोड़णारे बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असल्याकडे पालिकेने या पत्राद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

सार्वजनिक बांधकाम खात्याकड़े असलेले रस्ते.

  • रस्ता क्र - 81 वसई-पारनाका-अर्नाळा-विरार-कन्हेर-शिरसाड-अंबाड़ी 
  • रस्ता क्र - 83 - आगाशी-वटर-नाळे-वाघोली-निर्मळ-वसई-पापडी-उमेळा-नायगांव-जूचंद्र-बापाणे 
  • रस्ता क्र 45 -  वाघोली-सोपारा-तुळींज-पेल्हार  
  • रस्ता क्र - 46 - नालासोपारा-गोखिवरे-वालीव 
  • रस्ता क्र - 47 - वसई-सातीवली-कामण
  • रस्ता क्र - 48 - पारोळ-भिवंडी रस्ता ते देपिवली
     

दरम्यान; वसई-विरार महापालिकेने सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्या अखत्यारीतील रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी आयुक्त गंगाथरन डी. यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला १५ जून २०२० रोजी पत्र दिल्याचेही म्हटले होते. शहरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत सर्वाधिक रस्ते असून;  या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे नागरिकांचा रोष पालिकेला पत्करावा लागत असल्याची खंतही पालिकेने व्यक्त केली होती. मात्र आता सार्वजनिक बांधकाम खात्याने शहराला जोड़णाऱ्या सहा रस्त्याची यादी सादर करून पालिकेच्या 'आरोपाचा चेंडू' त्यांच्याच कोर्टात पुन्हा टोलावला आहे. 

 

मुसळधार पाऊस असल्याने खड्डे भरण्याचे काम रखडले आहे. पाऊस थांबल्यावर पुन्हा हे काम सुरु करण्यात येणार आहे. 
 राजेंद्र लाड ,
बांधकाम अभियंता वसई विरार महानगरपालिका

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे परंतु मुसळधार पावसाने त्यात व्यत्यय येत आहे. पाऊस थांबल्यावर हे काम पुन्हा सुरू करणार आहोत.
    प्रशांत ठाकरे,
अधीक्षक अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute between Vasai Municipality and Public Works Department; Harassment of citizens due to road misery