कल्याणमध्ये महिलांनी वाण म्हणून लुटले 'मास्क', काय आहे? वृत्त वाचा सविस्तर...

कल्याण : हळदी कुंकूनिमित्त मास्क वाटप करताना महिला वर्ग (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)
कल्याण : हळदी कुंकूनिमित्त मास्क वाटप करताना महिला वर्ग (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)

कल्याण : कल्याण पश्‍चिममधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला गेल्या आठवड्यात आग लागली. ही आग तब्बल 26 तासांनी विझवण्यात पालिकेला यश आले. हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या मागणीसाठी परिसरातील स्थानिक रहिवाशांनी विविध आंदोलने केली आहेत. मात्र, या आंदोलनांची दखल घेतली जात नसल्याने येथील नागरिकांच्या मरणयातना कायम आहेत. दरम्यान, याच भागातील "तीर्थधाम' गृहसंकुलामधील महिलांनी संक्रांतीनिमित्त करण्यात येणाऱ्या हळदीकुंकू समारंभाला आंदोलनाची जोड दिली. या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांनी वाण म्हणून चक्क "मास्क' लुटले आणि आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे, असा नाराही या वेळी दिला. 

मागील आठवड्यात डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याने पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका याविषयी गंभीर नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दर दिवशी या ठिकाणी 600 ते 650 टन कचरा टाकण्यात येतो. तीन वर्षात आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिकेला अपयश आले. परिणामी आजही येथील प्रश्न "जैसे थे' आहेत. 

मागील आठवड्यात डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीमुळे परिसरात प्रचंड धूर पसरला होता. आधीच दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांचे धुराने चांगलेच हाल झाले होते. धुरामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. आम्ही करदाते नागरिक असून आमच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. पालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा सूर या कार्यक्रमात महिलांनी लावला. डम्पिंग ग्राऊंडजवळ असलेल्या फडके मैदानात विविध राजकीय पक्षांच्या सभा होतात. या सभेच्या वेळी कचऱ्यावर सुवासिकाची फवारणी करण्यात येत असल्याचा आरोपदेखील या महिलांनी केला आहे. 

पालिका मागील अनेक वर्षांपासून या समस्येवर उपाययोजना करण्यात अपयशी ठरली आहे. केवळ कागदी घोडे नाचवले जातात; प्रत्यक्षात काहीही काम होत नसल्याचे वास्तव आहे. राज्य सरकार, न्यायालय तसेच हरित लवादापर्यंत हा प्रश्न पोहोचला आहे; मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही, हे वास्तव आहे. 
- महेश बनकर, 
सामाजिक कार्यकर्ते 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com