अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय झाले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मंगळवारी आवारात दुर्गंधी पसरली.

ठाणे : ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मंगळवारी आवारात दुर्गंधी पसरली. वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याने शवागार बंद ठेवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. बेवारस मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर शवागाराच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 
ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दररोज 700 ते 800 रुग्ण येतात. प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती व दाखल झालेल्या शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. अपघातात किंवा अन्य कारणांमुळे दगावलेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात आणले जातात. नियमानुसार सात दिवसापर्यंत मृतदेहाची देखभाल करणे अपेक्षित असते. परंतु, ओळख पटेपर्यंत हे मृतदेह सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारात ठेवले जातात. या शवागारात क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे 23 मृतदेह ठेवण्यात आले होते. प्रशासनाने पत्रव्यवहार करूनही पोलिस येथील मृतदेह नेले नाहीत. त्यामुळे पाच-सहा महिन्यांपासून मृतदेह शवागारात आहेत. 

ही बातमी वाचा ः करोना व्हायरस, बचावासाठी मुंबईत या केल्या उपाययोजना

शवागारातील वातानुकूलन यंत्रणा बंद पडण्याचे प्रकार यापूर्वीही झाले होते. आताही काही दिवसांपासून ही यंत्रणा बंद आहे. शवागारातील मृतदेह अन्यत्र नेले जात नाहीत तोपर्यंत वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करता येणार नाही. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी रात्रीपर्यंत 18 मृतदेह संबंधित पोलिस ठाण्यांच्या ताब्यात दिले आणि दोन मृतदेह भिवंडीतील रुग्णालयात पाठवले. सध्या येथील रुग्णालयात एकच मृतदेह आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शवागार सुरू होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 

 

रुग्णालयातील शवागारात 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे; मात्र अनेक महिन्यांपासून 23 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही पोलिसांकडून कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे बंद पडलेल्या वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती करण्यात अडचणी येत होत्या. सुमारे 16 महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, त्यानंतर आता पुन्हा हे काम करण्यात आले. 
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल रुग्णालय  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disturbed, air-conditioned system deteriorates in Thane Civil Hospital area