करोना व्हायरस : बचावासाठी मुंबईत या केल्या उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

10 डॉक्‍टरांचे पथक तैनात; पाच दिवसांत 189 जणांची तपासणी 

मुंबई : चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या करोन व्हायरस आजाराच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनर बसवण्यात आले आहे. यात गेल्या पाच दिवसांत 189 जणांची तपासणी झाली असून एकही संशयित आढळलेला नसल्याचे राज्याच्या आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. यासाठी 10 डॉक्‍टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

मोठी बातमी मला 'नाईट लाईफ' हे शब्दच आवडत नाही - उद्धव ठाकरे

चीनच्या वूआंग शहरात करोन (करोनाव्हायरस) व्हायरसमुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे; तर 201 जणांना त्याची लागण झाली आहे. या व्हायरसने फफ्फुसाला इजा होत असून न्यूमोनियाजन्य लक्षणे दिसत आहेत. या व्हायरसवर अद्याप उपचार उपलब्ध नाही. केंद्रीय आरोग्य विभागाच्या शिफारशीनुसार देशातील सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चीन तसेच हॉगकॉंगमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. प्री-इमिग्रेशनपूर्वी ही तपासणी थर्मल स्कॅनरने करण्यात येणार आहे.

धक्कादायक मुंबई पोलिसांनीच त्यांना वर्सोवाच्या फ्लॅटवर पाठवलं आणि...

मुंबईत चीनहून चीन एअरवेझ आणि दक्षिण अफ्रिकेच्या एका कंपनीचे विमान येते. त्या विमान कंपन्यांना त्याबाबत सूचना देण्याबाबत शिफारसही करण्यात आली आहे. करोना व्हायरसमुळे ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखी ही प्राथमिक लक्षणे जाणवतात. ही लक्षणे असलेल्या प्रवाशांनी विषेश काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या पाच दिवसांत 189 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात एकही संशयित रुग्ण आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले. 

हे वाचलेय का... बाकी काही नको, फक्‍त नोकरी द्या... 

थायलंड, जपानमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण 
चीनसोबतच दक्षिण कोरियात एक आणि थायलंड आणि जपानमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लू या आजाराचा व्हायरसही परदेशातून भारतात प्रवाशांच्या माध्यमातूनच आला आहे. सर्वप्रथम मे 2009 मध्ये हैदराबाद विमानतळावर स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला होता; तर ऑगस्ट 2009 मध्ये पुण्यातील एका लहान मुलामध्ये स्वाईन फ्लूचा व्हायरस आढळला होता. परदेशातून आलेला हा व्हायरस त्यानंतर रुग्णांमार्फत भारतीय वातावरणात पसरला.

Thermal Scanner at Mumbai Airport to protect against Corona virus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thermal Scanner at Mumbai Airport to protect against Corona virus