डोंबिवलीच्या फडके रोडला दिवाळी पहाटेची आस ; कोरोना संसर्ग कमी झाल्याने तरुणाईत उत्साह

डोंबिवलीच्या फडके रोडला दिवाळी पहाटेची आस ; कोरोना संसर्ग कमी झाल्याने तरुणाईत उत्साह

ठाणे : रस्त्यावर काढलेल्या भव्य रांगोळ्या, ढोलताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेली तरुणाई आणि त्यांचा सळसळता उत्साह अशा वातावरणात दर वर्षी दिवाळी पहाट साजरी होत असते. डोंबिवलीतील फडके रोड हा तरुणाईचा केंद्रबिंदू मानला जातो. या वर्षी कोरोनामुळे गुढीपाडव्यालाही फडके रोड तरुणाईविना सुनासुना होता; मात्र आता शहरे अनलॉक झाली असून कोरोना रुग्णवाढीचा दरही खाली आला आहे. यामुळे तरुणाईच्या फडके रोडलाही दिवाळी पहाटेची आस लागली आहे. कार्यक्रमाचे नियोजन नसले, तरी परंपरेनुसार तरुणाई एकमेकांना भेटून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणार का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

डोंबिवलीतील फडके रोडची ओळख दिवाळी पहाट आणि तरुणाईचे भेटण्याचे हक्काचे ठिकाण अशीच झाली आहे. दिवाळी पहाटेला श्री गणेश मंदिरात गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि नंतर आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणी यांना भेटायचे, ही परंपरा सुरू झाली. गुढीपाडव्याप्रमाणेच दिवाळी पहाटेलाही डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणांची गर्दी होते. कामाचा व्याप, सुट्टी नाही, कामात व्यग्र आहे या साऱ्या शब्दांना बाजूला सारत तरुणाई गटागटाने दिवाळीला या रस्त्यावर अवतरते आणि मग जुन्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छांची देवाणघेवाण करून दिवाळीचा आनंद दर वर्षी साजरा केला जातो. या वर्षी सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. गुढीपाडव्याला फडके रोड तरुणांविना सुनासुना दिसून आला. 

मार्च महिन्यापेक्षा आता शहरात चित्र वेगळे आहे. शहरात अनलॉक करण्यात आले असून जनजीवनही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाल्याने तरुणांच्या खास असलेल्या फडके रोडवर दिवाळी पहाटेला तरुणाई उतरेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारने अद्याप कोणतीही सूचना केलेली नसल्याने दर वर्षीप्रमाणे कार्यक्रम व इतर गोष्टी नसल्या तरी परंपरा जपत मित्र-मैत्रिणींना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा विचार काही जण करीत आहेत; तर काही जण गर्दी टाळण्यासाठी फडके रोडवर न भेटता इतर ठिकाणी भेटता येईल का, याची चर्चा करीत आहेत. 

काय आहे तरुणाईच्या मनात... 
शाळा, क्‍लास बंद असल्याने गेले पाच-सहा महिने घरात असलेली मुले आता कंटाळली आहेत. मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी त्यांनी दिवाळीचा मुहूर्त शोधला असून दिवाळी पहाटेला आम्ही एकत्र येणार असल्याचे स्वप्नाली थत्ते हिने सांगितले. अगदी फडके रोडवर असे नाही; परंतु ग्रुपमधील एकाच्या घरी किंवा निवांत ठिकाणी भेटण्याचा बेत आम्ही आखत असल्याचेही तिने सांगितले; तर मयुरी पाटील म्हणाली, दर वर्षी आम्ही मित्रमैत्रिणी दिवाळीला भेटतो. या वर्षी कोरोनामुळे अद्याप काहीही ठरविलेले नाही. दिवाळी पहाटेला जाता आले नाही, तरी रविवारी सुटीच्या दिवशी भेटण्याचा आमचा विचार आहे. 

Diwali pahat on Phadke Road in Dombivli Enthusiasm in youth as corona infection decreases
--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com