दिवाळीत ठाण्याहून सुटणाऱ्या STच्या फेऱ्या कमी, भाऊबीजेला अतिरिक्त बसेस

राहुल क्षीरसागर
Sunday, 15 November 2020

ठाणे विभागाने खोपट येथून मुंबई, कल्याण, भिवंडी आणि बदलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या ४० टक्के फेऱ्या कमी केल्या. त्यात लोकल प्रवास बंद असल्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांची शुक्रवारी सायंकाळी बस स्थानकात गर्दी पाहायला मिळाली.

मुंबईः  दिवाळीच्या मुहूर्तावर शुक्रवारपासून सरकारी कार्यालयाना लागून करण्यात आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने खोपट येथून मुंबई, कल्याण, भिवंडी आणि बदलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या ४० टक्के फेऱ्या कमी केल्या. त्यात लोकल प्रवास बंद असल्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांची शुक्रवारी सायंकाळी बस स्थानकात गर्दी पाहायला मिळाली. बस उशीराने येत असल्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कार्यालय बंद असल्यामुळे बस रिकाम्या धावण्याची शक्यता घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एस्टी प्रशासनाने दिली. दुसरीकडे भाऊबीजेच्या मुहूर्तावर अतिरिक्त बस गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी विभागाकडून करण्यात आले असल्याची माहितीही प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य नोकरदार वर्गाला लोकलमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला फटका बसला आहे. या खासगी नोकरदारांच्या प्रवासासाठी राज्य परिहवन महामंडळाच्या ठाणे विभागाने अतिरिक्त बस सोडण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा-  पत्रीपूल गर्डर लॉन्चिंगसाठी रात्रीच्या वाहतुकीत बदल, अधिसूचना जाहीर

खोपट बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस मुंबईतील दादर, मंत्रालय तसेच डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, बदलापूर या ठिकाणी जातात. त्यामुळे नोकरदार वर्गाला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दिवाळीच्या मुहूर्तावर सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने मुंबईतील सरकारी कार्य्ल्यांसह खासगी कार्यालये बंद असल्याने प्रवासी संख्येत देखील घट होणार असल्याच्या शक्यतेने राज्य परिवहन महामंडळाने शुक्रवारपासूनच खोपट येथून सुटणाऱ्या 40 टक्के फेऱ्या कमी केल्या. त्याचा फटका शुक्रवारी कार्यालयातून घरी प्रतीच्या प्रवासाच्यावेळी नोकरदारांना बसला.

गाड्यांच्या फेऱ्या कमी केल्यामुळे ठाण्यातील खोपट रेल्वे स्थानकात काही काळ प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाचे विभाग प्रशासनाकडे विचारणा केली असता, दिवाळी निमित्त सलग सुट्टी असल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन बसेसच्या फेऱ्या कमी केल्याची माहिती दिली.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, सोमवारी भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांचे प्रवासासाठी हाल होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर, कल्याण, वसई आणि मुंबईच्या दिशेने अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार असून त्याबाबतचे नियोजन करण्यात आल्याची माहिती एस्टी विभागाकडून देण्यात आली आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

On Diwali there are fewer ST trains departing from Thane extra buses bhaubij


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Diwali there are fewer ST trains departing from Thane extra buses bhaubij