esakal | 'कोविड ड्युटीचा पहिला दिवस आजही आठवतो'; डॉक्टरांनी सांगितला अनुभव

बोलून बातमी शोधा

'कोविड ड्युटीचा पहिला दिवस आजही आठवतो'; डॉक्टरांनी सांगितला अनुभव

'कोविड ड्युटीचा पहिला दिवस आजही आठवतो'; डॉक्टरांनी सांगितला अनुभव

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचं म्हटलं जातं आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी व्हावा आणि हा विषाणू नष्ट व्हावा यासाठी प्रशासन, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीदेखील सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामध्येच दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टर अहोरात्र त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणेज रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी असंख्य डॉक्टर व इतरेतर कर्मचारी स्वत:च्या आरोग्याची किंवा कुटुंबाची पर्वा न करता केवळ जनतेसाठी झटत आहेत. यामध्येच मुंबईतील एका डॉक्टराने त्याचा सध्याच्या काळातील अनुभव शेअर केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या डॉक्टरांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चिला जात आहे.

मुंबईतील King Edward Memorial Hospital या नामांकित रुग्णालयात काम करणारे डॉक्टर अग्नी कुमार बोस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्याच्या काळातील रुग्णालयाची परिस्थिती व डॉक्टर करत असलेला संघर्ष सांगितला आहे. २४ तास पीपीई कीट घालून काम करतांना कशा अडचणी येतात हेदेखील त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा: "याआधी असं पाहिलं नव्हतं"; महिला डॉक्टरच्या भावनांचा फुटला बांध

"शिफ्ट सुरु होण्यापूर्वी आम्ही थोड पाणी पितो. कारण, दिवसभर धावपळ सुरु असल्यामुळे मधल्या काळात पाणी प्यायलाही वेळ नसतो. यात अनेकदा पाणी न प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रासदेखील होतो. मात्र, त्यावेळी रुग्णांचे हाल पाहून आम्हाला आमच्या त्रासाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. ड्युडी संपल्यानंतर मग आम्ही पाणी पितो. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी आम्हाला पीपीई कीट घालणं गरजेचं आहे. त्यामुळे दररोज २४-२४ तास आम्ही पीपीई कीटमध्ये वावरत असतो.परंतु, अंगावर असलेल्या या कीटमुळे अनेकदा अस्वस्थ व्हायला होता. सध्याच्या काळात मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्हीदेखील रुग्णालयात वावरतांना सक्तीने मास्क वापरतो. परंतु, अनेक तास मास्क चेहऱ्यावर असल्यामुळे काही वेळा श्वास घेण्यासही अडचण निर्माण होते. अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो. सध्या रुग्णालयातील प्रत्येक वॉर्ड रुग्णांनी गच्च भरलेला आहे. गेल्या दोन आठड्यांपासून परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. हा काळ अत्यंत कठीण आहे.", असं डॉक्टर बोस यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "मला आजही गेल्या वर्षीचा माझ्या कोविड ड्युटीचा पहिला दिवस लख्खपणे लक्षात आहे. त्यावेळी माझी शिफ्ट रात्री २ ते सकाळी ८ या वेळात होती. या शिफ्टमध्ये जवळपास १५ जणांचा आमच्यासमोर मृत्यू झाला होता. यात मृत्यू पावलेला एक रुग्ण केवळ ३७ वर्षांचा होता. समोर घडत असलेलं चित्र पाहून डोळे खाडकन उघडले होते. थकवा आल्यानंतरही शांत झोप लागत नाही. त्यामुळे अनेकदा मी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपण्याचा प्रयत्न करतो."

दरम्यान, यापूर्वी डॉक्टर तृप्ती गिलाडा यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. सध्याच्या काळात रुग्णालय व रुग्ण यांची परिस्थिती नेमकी कशी आहे याविषयी त्यांनी जनतेला माहिती दिली होती. तसंच काळजी घेण्याचं आवाहनही केलं होतं. गेल्या काही काळापासून कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून काहींना त्यांचे प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहेत.