esakal | "याआधी असं पाहिलं नव्हतं"; महिला डॉक्टरच्या भावनांचा फुटला बांध

बोलून बातमी शोधा

doctor breaks down in tears on corona situation

"याआधी असं पाहिलं नव्हतं"; महिला डॉक्टरच्या भावनांचा फुटला बांध

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुंबई : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. अनेक राज्यांमधील जनता या विषाणूसोबत लढा देत आहे. यात महाराष्ट्राचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर व बेडची कमतरता जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी सातत्याने सेवा बजावत रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, दररोज रुग्णांचे होणारे हाल पाहून डॉक्टरही भावनिकदृष्ट्या हतबल झाले असून त्यांच्या भावनांचा बांध फुटू लागला आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एका महिला डॉक्टरचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

सध्या सोशल मीडियावर मुंबईतील infectious diseases specialist डॉ. तृप्ती गिलाडा यांचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी कोरोनामुळे रुग्णांवर ओढावलेलं संकट, त्यांची बिकट परिस्थिती आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीविषयी भाष्य केलं आहे.

हेही वाचा: Corona virus: जाणून घ्या, मुंबईत कुठं उपलब्ध आहेत बेड

"दिवसेंदिवस सगळ्या राज्य व शहरांमधील स्थिती गंभीर होत चालली आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये आयसीयूमध्ये जागा नाही. यापूर्वी अशी स्थिती आम्ही कधीच कोणी पाहिली नव्हती. आम्ही हतबल आहोत. जर गेल्या वर्षभरापासून तुम्हाला कोरोनाची लागण झाली नसेल आणि तुम्ही सुपरहिरो आहात किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजामध्ये आहात. आम्ही लोक ३५ वर्षांच्या तरुणांना पाहतोय जे व्हेंटीलेटरवर आहेत आणि मृत्युशी झगडत आहेत, असं तृप्ती यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणतात, "खरंच अशी परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नव्हती. एकाच वेळी इतक्या व्यक्तींना हाताळावं लागेल असं वाटलं नव्हतं. आम्ही लोकांना त्यांच्या घरात राहून ऑक्सिजनची सेवा पुरवण्याचं काम करत आहोत. आताच्या परिस्थितीमध्ये आमच्या डॉक्टरांचादेखील भावनिक बांध फुटू लागला आहे. त्यामुळे या काळात कृपया स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. कोरोना तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघतांना मास्क वापरा. ताप आला तर घाबरुन जाऊ नका लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा."

दरम्यान, गेल्या काही काळापासून कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून काहींना त्यांचे प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहेत.