
Crime News : डॉक्टरने मेडिकल व्यवसायिकाच्या डोक्यात घातली लोखंडी सळई; 5 हजार डिपॉझिट वरून वाद
डोंबिवली - पाच हजार रुपये डिपॉझिट वरून झालेल्या वादात डॉक्टरने मेडिकल व्यवसायिकाच्या डोक्यात लोखंडी सळई घातल्याची घटना उंबर्ली रोडवरील क्लिनिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात डॉ. पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहम्मद हुसेन जैरुउद्दीन अन्सारी (वय 24) असे जखमी झालेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव आहे.
डॉक्टर पाटील यांच्या मालकीचा मानपाडा भागात दुकानाचा गाळा आहे. हा गाळा इंदिरा नगर येथे राहणारे मेडीकल व्यवसायिक अन्सारी व त्यांच्या मित्रांनी भाडे तत्वावर देण्याची बातचीत करून सदर गाळ्याचे डॉक्टरला 5 हजार रुपये डीपॉझीट म्हणून अन्सारी याने दिले. मात्र काही दिवसांपूर्वीच डॉक्टरने मेडीकल व्यवसायिकाला गाळा न देतात, तो गाळा दुसरा भाडेकरूला दिला. त्यामुळे गाळ्याचे दिलेले डीपॉझीट परत मिळावे म्हणून अन्सारी याने डॉक्टरकडे तगादा लावला होता.
मात्र, डॉक्टर पाटील हे अन्सारी याला डीपॉझीट देण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अन्सारी व त्याचा मित्र मानपाडा गावातील उंबार्ली रोडवर असलेल्या डॉक्टर पाटीलच्या क्लिनिकमध्ये गेले होते. त्यावेळी डॉक्टरने डीपॉझीट परत देण्यास नकार देऊन दोघांना शिवीगाळ करून वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन डॉक्टरने क्लिनिकमध्ये असलेली लोखंडी सळई हातात घेऊन अन्सारी यांच्या डोक्यात घातली. या घटनेत अन्सारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
मेडिकल व्यावसायिक अन्सारी याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात डॉक्टर पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. जोशी करीत आहेत.