कोंडलेल्या जीवाला अखेर मोकळा श्‍वास

नरेश पवार
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

बरणीत तोंड अडकलेला तो मुका प्राणी तसाच भटकत होता. आता तर त्याला तोंडही उघडता येत नव्हते. श्‍वास घेणेही कठीण झाले होते. अशा वेळी त्याच्या मदतीला धावला मोहित पाटील हा तरुण. त्या मुक्या प्राण्याचे हाल पाहून त्याचे काळीज द्रवले.

पेण : धुवांधार पाऊस. सर्वत्र पूरपरिस्थिती. माणसांचे खाण्यापिण्याचे हाल, तेथे मुक्या प्राण्यांचे काय? भटक्या  प्राण्यांचे हाल तर कुत्रे खाईना. पोटातल्या भुकेने व्याकूळ झालेल्या अशाच एका भटक्या श्‍वानाला एक प्लास्टिकची बरणी दिसली. आत काही तरी खायला असेल, असे समजून त्याने त्या बरणीत तोंड घातले. आत काहीही नव्हते. पण आता त्या बरणीनेच त्याचे तोंड ‘गिळले’ होते. किती झटकले, हिसकले, पण त्याचे तोंड काही त्यातून बाहेर पडेना.  

शहरातील गोदावरीनगरमधील ही घटना. बरणीत तोंड अडकलेला तो मुका प्राणी तसाच भटकत होता. आता तर त्याला तोंडही उघडता येत नव्हते. श्‍वास घेणेही कठीण झाले होते. अशा वेळी त्याच्या मदतीला धावला मोहित पाटील हा तरुण. त्या मुक्या प्राण्याचे हाल पाहून त्याचे काळीज द्रवले.

तातडीने त्याने अग्निशमन दलासह मित्रमंडळीची मदत घेतली. कुंभार आळी येथील प्राणिमित्र शुभम माने, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, सामाजिक कार्यकर्ते राजू पिचिका यांच्याबरोबर संपर्क साधला. ही मंडळी काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचली. अत्यंत प्रयत्नपूर्वक त्या श्‍वानाचे तोंड त्यांनी त्या बरणीतून सोडविले. एका भुकेल्या, मरणगतीला लागलेल्या श्‍वानाला या प्राणीमित्रांनी जीवनदान दिले.  

अंबा नदीच्या पुराचा तडाखा पेण शहराला बसला होता. गावागावांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे हजारोंना जीव वाचवण्यासाठी धावाधाव करावी लागली. जलसंकटामुळे माणसे त्रासलेली. त्यात ती या प्राण्यांकडे कशी लक्ष देणार, अशी परिस्थिती असतानाही या प्राणीमित्रांनी भूतदया दाखविली. एका श्‍वानाची प्लास्टिकच्या संकटातून सुटका केली याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog rescue in Pen