लातूर वरून येऊन दुचाकी चोरणारास पोलिसांनी केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali Crime : लातूर वरून येऊन दुचाकी चोरणारास पोलिसांनी केली अटक

डोंबिवली स्टेशन परिसरात लागलेल्या सीसीटिव्ही मध्ये तो कैद झाला. आणि कल्याण गुन्हे शाखेने सीसीटिव्ही व गुप्त बातमीदार मार्फत मानपाडा परिसरातून अटक केली.

Dombivali Crime : लातूर वरून येऊन दुचाकी चोरणारास पोलिसांनी केली अटक

डोंबिवली - लातूर वरुन भिवंडी येथे आई वडिलांकडे दर पंधरा दिवसांनी तो यायचा. कल्याण डोंबिवली परिसरात स्टेशन बाहेर हॅण्डल लॉक न करता पार्क केलेल्या दुचाकी चोरुन तो लातूर, पुणे, सोलापूर येथे नेऊन विकायचा.

डोंबिवली स्टेशन परिसरात लागलेल्या सीसीटिव्ही मध्ये मात्र तो कैद झाला आणि कल्याण गुन्हे शाखेने सीसीटिव्ही व गुप्त बातमीदार मार्फत मानपाडा परिसरातून अटक केली. शुभम पवार (वय 19) असे अटक आरोपीचे नाव असून मौज मज्जा आणि प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी तो या चोऱ्या करत होता. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार डोंगरे यांनी दिली.

कल्याण, ठाकुर्ली व डोंबिवली स्टेशन परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी चोरींचे प्रमाण गेल्या वर्षभरात वाढले आहे. कल्याण डोंबिवली परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी होत असून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. पथकातील पोलिस अंमलदार गुरुनाथ जरग यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या होत्या. गुप्त बातमीवरून पोलीस उपनिरिक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने मानपाडा येथील कोळेगावातून शुभम याला अटक केली.

शुभम मुळचा लातूर येथील निलंगा परिसरात राहणारा आहे. भिवंडी येथे त्याचे आई वडिल रहात आहेत. पंधरा दिवसांनी तो शहरात यायचा आणि स्टेशन परिसरातील दुचाकी चोरुन त्या लातूर, पुणे, सोलापूर येथे नेऊन विकत असे. मौजमजेसाठी तो दुचाकी चोरी करत असे. त्याच्यावर महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, डोंबिवली, कल्याण रेल्वे पोलिस, विष्णूनगर, कोनगाव आदि पोलिस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी 13 गुन्ह्यातील एकूण 16 लाख रुपये किंमतीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला मंगळवारी हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.