डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manpada police

डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

डोंबिवली : गोलवली गावात (Golavali village) राहणाऱ्या पुरण महतो याची हत्या झाली होती. यातील आरोपी हे झारखंडला (Jharkhand) पळून गेल्याची माहिती मानपाडा पोलिसांना (Manpada police)मिळाली. आरोपीला पकडण्यास मानपाडा पोलिसांचे पथक झारखंडला गेले. तेथील गावकऱ्यांनी पोलीसांच्या पथकावर दगडफेक (stone attack) करीत हल्ला चढवला. गावकऱ्यांचा हल्ला परतवून लावत पोलिसांनी एका आरोपीस (culprit arrested) झारखंड वरून अटक केली. कालूकुमार महतो (वय 25) असे अटक आरोपीचे नाव असून त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी लालूकुमार महतो याचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे (jay more) यांनी दिली.

हेही वाचा: ...त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय - पवार

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोलवली येथे 4 नोव्हेंबरला एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जात तपास करत जखमी पुरण महतो (वय 47) याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्थानिक लोकांकडे मानपाडा पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या गावाकडील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पुरण याचे चुलत भाऊ कालूकुमार आणि लालूकुमार याच्याशी वाद झाले. चुलत भावांनी त्याच्या डोक्यात दगड घालून हल्ला करून तेथून पळून गेले असल्याची माहिती पोलिसांना दिली.

सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 8 नोव्हेंबरला पुरण याचा मृत्यू झाला. लालू आणि कालू यांचा शोध पोलिस घेत असतानाच मोबाईलच्या आधारे म्हारळ, शहाड, सुरत, अंकलेश्वर, भरुच, भुसावळ याठिकाणी पथके पाठवून शोध घेतला. त्यानंतर ते झारखंड या मूळ गावी ते पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 तारखेला सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, ज्ञानबा सूर्यवंशी, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, भानुदास काटकर, विजय कोळी, प्रविण किनरे, यल्लपा पाटील यांचे पथक झारखंडला रवाना झाले.

15 ला पोलिसांचे पथक कालूकुमार याला पकडण्यासाठी गावात गेले असता पथकावर आरोपीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी दगडफेक करून हल्ला चढवला. परंतु गावकऱ्यांचा विरोध न जुमानता सहाय्यक पोलीस निरीक्षक वणवे यांच्या पथकाने कालूकुमार याला 16 ला अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील आणखी एक आरोपी लालूकुमार याचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांनी सांगितले.

जमिनीच्या वादातून हत्या

पुरण व त्याचे चुलत भाऊ कालूकुमार व लालूकुमार हे गोलवली मध्ये रहाण्यास आहेत. गावाकडील संपत्तीवरून त्यांच्यात वाद होते. याप्रकरणी गावी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. 4 नोव्हेंबरला चुलत भावांनी पुरणला घरी जेवण करण्यास बोलावले. त्याला दारू पाजून नंतर त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्यावर ते तेथून पळून गेले.

loading image
go to top