
शिंदे गट व भाजपाचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मंगळवारी या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
संथ गती कामांना येत्या दोन वर्षात गती मिळेल - कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण
डोंबिवली - राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला. डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते सायंकाळी डोंबिवलीत दाखल झाले. मंत्री डोंबिवलीत दाखल होताच भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात स्वागत यात्रा काढत मंत्री चव्हाण यांचे स्वागत केले. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले असून येत्या काळात विकास कामे जलद गतीने होतील. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याकडे या सरकारचा कल असून जी विकास कामे गेले अनेक वर्षे रखडली आहेत, त्यांना पुढील दोन वर्षात गती प्राप्त होऊन येणारा काळ हा येथील नागरिकांसाठी सुखावह असेल याकडे लक्ष दिले जाईल असे यावेळी नवनिर्वाचित मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
शिंदे गट व भाजपाचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मंगळवारी या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांना फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सायंकाळी ते पलावा येथील राहत्या घरी परतले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. घरी पोहोचल्यावर त्यांनी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. नंतर कार्यकर्त्यांनी घरडा सर्कल ते गणेश मंदिर अशी स्वागत यात्रा काढण्यात आली. रस्त्याने पायी चालत नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात डबल इंजिनचे सरकार आले आहे. विकासाची कामे जलदगतीने झाली पाहिजेत, आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचे प्रश्न कसे सोडविले जातील याकडे सरकारचे लक्ष आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एमएमआर रिजन मध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे, वाहतूक कोंडीतून हा परिसर मुक्त झाला पाहिजे यासाठी रिंगरोड, मेट्रो किंवा इतर जे अत्यंत महत्वाचे प्रकल्प जे गेल्या काही काळापासून संथगतीने सुरू आहेत. त्यांना येत्या काळात गती प्राप्त होईल. यामुळे येणारा काळ हा येथील नागरिकांसाठी सुखावह असेल याकडे नक्की लक्ष देईल असे मत नवनिर्वाचित मंत्री चव्हाण यांनी डोंबिवली येताच प्रथम मांडले.