पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर फवारला विषारी स्प्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poisonous spray

Dombivali News : पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर फवारला विषारी स्प्रे

डोंबिवली - पायी चालणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर कारमधून आलेल्या व्यक्तींनी विषारी स्प्रे मारल्याची घटना रविवारी घडली. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात भर दुपारी ही घटना घडली असून सुशिल मुननकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशील यांची भाची रसिका बांदिवडेकर यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार रसिका या आपल्या परिवारासोबत कल्याण पूर्वेत राहतात. रसिका या घाटकोपर येथे नोकरी करतात. रसिकाचा मामा सुशील हे मिरा भाईंदर येथे नोकरीस आहेत.

रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुशील हे नेतीवली नाका परिसरातील ओमा हॉस्पीटलजवळून पायी चालत घरी जात होते. यावेळी तेथे एक सफेद रंगाची मोटार कार आली. त्यातील अनोळखी इसमाने सुशील यांच्या चेहर्यावर विषारी स्प्रे ची फवारणी केली. तो स्प्रेचा मारा वाचविण्यासाठी सुशील हे खाली वाकले. परंतू त्यांच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूला विषारी स्प्रेची फवारणी झाली. घरी जाईपर्यंत सुशील यांच्या चेहरा आणि डोळ्यांची जळजळ सुरु झाली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.