
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील रेल्वेचे फाटक मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास उघडेच राहिले होते.
Railway : ट्रेन आली तरी दिवा वसई रेल्वे मार्गावरील फाटक उघडेच
डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील रेल्वेचे फाटक मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास उघडेच राहिले होते. ट्रेन येत असूनही फाटक उघडे असल्याची बाब एका जागरूक नागरिकाच्या लक्षात येताच त्याने गेटमनला सांगत फाटक बंद करण्यास लावले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि रात्रीची वेळ असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती, मात्र जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
डोंबिवली पश्चिमेला मोठागाव परिसरातून दिवा वसई रेल्वे मार्ग जात आहे. विष्णू नगर परिसरातून मोठागाव येथे जाण्यासाठी नागरिक, वाहनचालक यांना हे रेल्वे फाटक ओलांडून जावे लागते. मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास हे रेल्वे फाटक उघडे होते. एक नागरिक फाटक ओलांडून जात असताना रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे येताना त्याला दिसले. रेल्वे येत असूनही फाटक बंद न झाल्याने त्याने गेटमनच्या खोलीत जाऊन त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.
यावेळी रेल्वे कर्मचारी हे झोपले असल्याचे त्याच्या लक्षात आले. रात्रीची वेळ असल्याने वाहनांची वर्दळ कमी असली तरी एखाद्या वाहन चालकाच्या लक्षात ही बाब आली नसती तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून बाळासाहेबांची शिवसेनेचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी ट्विटच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.