Rashmi Thackeray : शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे यांची एन्ट्री

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात विविध कार्यक्रम घेण्यास पक्षांनी सुरुवात केली आहे.
Banner Rashmi Thackeray
Banner Rashmi ThackeraySakal

डोंबिवली - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात विविध कार्यक्रम घेण्यास पक्षांनी सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकतेच मंगळागौर कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करत त्या कार्यक्रमांस मुख्यमंत्री शिंदे यांची पत्नी लता शिंदे व सून वृषाली शिंदे यांनी उपस्थिती लावत मतदारसंघ पिंजून काढला होता.

कल्याण पश्चिम मतदार संघ हा सध्याच्या घडीला शिवसेनेचा बालेकिल्ला बोलला जातो. येथील आमदार विश्ननाथ भोईर हे शिंदे गटात सामील आहेत. या मतदार संघात लागलेले शिवसेना ठाकरे गटातील रश्मी ठाकरे यांचे बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे येथे उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे येऊन गेल्या आहेत. मात्र कल्याण डोंबिवली हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे बंडानंतर प्रथमच रश्मी या येणार असून आता येथे शिवसैनिकांना त्या काय आव्हान करतात हे पहावे लागेल.

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यावतीने श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी आचार्य अत्रे रंगमंदिरात असणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून रश्मी ठाकरे या उपस्थित राहणार आहेत. त्याविषयीचे बॅनर कल्याण शहरात लागले असून ते लक्ष वेधून घेत आहेत.

कल्याण पश्चिम हा 2009 च्या मतदारसंघ फेररचनेनंतर अस्तित्वात आलेला नवा मतदारसंघ आहे. या मतदार संघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशी असली तरी 2009 ला मनसेचे प्रकाश भोईर यांनी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र देवळेकर यांचा पराभव करत विजय मिळविला होता. तर 2014 ला शिवसेना भाजपमधील युती तुटली.

भाजपचे नरेंद्र पवार यांनी त्यावेळी शिवसेनेचे विजय साळवी यांचा पराभव करत विजय मिळविला होता. 2019 च्या निवडणूकीत आधी भाजपच्या वाट्याला कल्याण पश्चिम जागा सोडण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या आग्रहाखातर ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली व येथे विश्वनाथ भोईर यांचा विजय झाला होता.

शिवसेनेत शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी शिंदे गटात कल्याण पश्चिमचे आमदार भोईर यांचाही समावेश होता. यामुळे शिवसेनेत आता शिंदे व ठाकरे असे दोन गट पडले असले तरी कल्याण पश्चिम येथे शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते आहे.

शिंदे यांच्या दुफळी नंतर उद्धव ठाकरे शिंदे यांच्या ठाण्यात येऊन गेले. नवरात्रोत्सवा दरम्यान रश्मी ठाकरे यांनी देखील टेंभी नाका येथील देवीचे दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. ठाणे प्रमाणेच कल्याण डोंबिवलीत देखील शिवसेनेचे वर्चस्व आहे, मात्र येथे ठाकरे परिवाराने आत्तापर्यंत उपस्थिती लावली नाही.

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर कल्याण मधील शिवसैनिकांनी हा ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा दर्शविला होता. कल्याण येथील शिवसेनेच्या शाखांवर शिंदे गटाकडून कब्जा करण्यात येत असताना कल्याण येथे शिवसैनिकांनी जोरदार विरोध केल्याचे पहायला मिळाले.

मात्र येथील शिवसैनिकांच्या भेटीसाठी आत्तापर्यंत ठाकरे परिवारातील कोणतीही व्यक्ती आली नव्हती. आता मात्र श्रावणसरीच्या कार्यक्रमानिमित्त रश्मी ठाकरे या कल्याणच्या ऐतिहासिक नगरीत एन्ट्री करणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाकडून मंगळागौर चे आयोजन कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे यांची पत्नी व सूनेने या कार्यक्रमांना उपस्थिती लावत हा मतदार संघ पिंजून काढला आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले आहे.

आता ठाकरे गट देखील मागे राहीला नसून या गटाकडून देखील महिला मतदारांना खूश करण्यासाठी श्रावण सरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिम मतदार संघातून या उपक्रमास सुरुवात होत असून रश्मी यावेळी कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com