
हमाल असल्याचे भासवून दोघा चोरट्यांनी एका दिव्यांग महिलेची बॅग कल्याण स्थानकात चोरुन पळ काढला होता.
Crime News : हमाल असल्याचे भासवत दिव्यांग महिलेची लूट; दोघांना केली अटक
डोंबिवली - हमाल असल्याचे भासवून दोघा चोरट्यांनी एका दिव्यांग महिलेची बॅग कल्याण स्थानकात चोरुन पळ काढला होता. लाखोंचा माल चोरुन या चोरट्यांनी वाराणसी एक्सप्रेसमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. कल्याण रेल्वे स्थानकातील सीपीडिएस पथकाने सीसीटिव्ही तपासत सदर गाडी चाळीसगाव येथून पास होताच भूसावळ सीपीडीएस पथकाशी संपर्क साधला. सीपीडीएस पथकाने भुसावळ स्थानकातून विजयकुमार बनारसीलाल निषाद आणि रामतहल खडेरु गौतम यांना ताब्यात घेतले. दोघांनाही कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीची रोकड व 1 लाख 46 हजार रुपयांचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पूनम भारद्वाज या दिव्यांग असून त्या कल्याण स्थानकातून 3 डिसेंबरला प्रवास करत असताना विजय कुमार व रामतहल या दोघा भामट्यांनी हमाल असल्याचे त्यांना सांगत त्यांच्याकडील सामान उचलले. यावेळी त्यातील एक बॅग चोरुन त्यांनी कल्याण स्टेशन मधून पलायन केले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पूनम यांनी बॅग चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार कल्याण लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफचे सीपीडीएस (डी) (रेल्वेचे नियमित तपासणी करणारे पथक) पथकाने तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज पाहीले असता दोघे भामटे बॅग घेऊन जाताना त्यात दिसून आले. ते दोघे बॅग घेऊन वाराणसी एक्सप्रेसच्या सामान्य बोगीत चढले असल्याचे त्यात दिसून आले. त्यानुसार वाराणसी एक्सप्रेसचा धावत्या स्थितीचा आढावा घेतला असता सदर गाडीने चाळीसगाव स्थानक ओलांडले असल्याचे दिसून आले.
सीपीडीएस टिमचे सौनी प्रसाद चौगुले यांनी तात्काळ भूसावळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सर्व माहिती त्यांना दिली. भुसावळ आरपीएफचे ड्युटी इन्चार्ज सौनी दिपक कालवे यांनी सहकाऱ्यांसह वाराणसी एक्स्प्रेसच्या जनरल बोगी ची झडती घेतली. यावेळी आरोपी विजयकुमार बनारसीलाल निषाद आणि रामतहल खडेरू गौतम हे त्यात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीची रक्कम आणि 1 लाख 46 हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले. दोन्ही आरोपींना भुसावळ येथून कल्याण जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. याचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलिस करत आहेत.