ड्रेस बदलला, पण चप्पल बदलण्यास विसरली; चप्पलने फोडले तिचे चोरीचे बिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali Crime : ड्रेस बदलला, पण चप्पल बदलण्यास विसरली; चप्पलने फोडले तिचे चोरीचे बिंग

Dombivali Crime : ड्रेस बदलला, पण चप्पल बदलण्यास विसरली; चप्पलने फोडले तिचे चोरीचे बिंग

डोंबिवली - मावस बहिणीकडे वडिलोपार्जित खूप सोन्याचे दागिने आहेत हे समजले आणि तिची नियत फिरली. बहीण कार्यक्रमासाठी कामोठे येथे आली असता तिच्या पर्स मधून तिने घराची चावी चोरुन घरातील तब्बल 400 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. सीसीटीव्ही मध्ये आपण ओळखले जाऊ नये म्हणून रस्त्यात तिने ड्रेस चेंज केला, पण चप्पल बदलण्यास विसरली. याच चप्पलने तिचे चोरीचे बिंग फोडले आणि ती मानपाडा पोलिसांच्या जाळ्यात अडकली. सिमरन पाटील (वय 27) असे अटक आरोपी महिलेचे नाव आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोणी पलावा येथे प्रिया सक्सेना या राहण्यास आहे. प्रिया हिची कामोठे येथे राहणारी मावस बहिण सिमरन ही काही डोंबिवलीत बहिणीकडे राहण्यास आली होती. याच वेळी प्रिया हिच्याकडे सोन्याचे दागिने व वडिलोपार्जित दागिने असल्याची माहिती यावेळी सिमरनला समजली आणि तिची नियत फिरली. झटपट पैसे कमवण्यासाठी तिने ते दागिने चोरण्याची योजना आखली. 13 जानेवारीला कामोठे येथे एका कार्यक्रम निमित्त प्रिया येणार असल्याची सिमरनला समजले. ती कार्यक्रमाला येताच सिमनरने तिच्या पर्स मधील घराची चावी व इमारतीमध्ये शिरण्यासाठी लागणारे कार्ड चोरले, चोरी करुन पुन्हा चावी बहिणीच्या पर्स मध्ये ठेवण्याची तीची योजना होती. रात्री 9.15 च्या दरम्यान तिने चावी चोरली आणि कामोठे येथूनच रिक्षा करुन तिने डोंबिवली गाठली.

दरम्यान यावेळी तिने आपण कोठेही पकडले जाऊ नये, इमारती मधील सीसीटिव्ही येऊ नये म्हणून ड्रेसवरुन तिने एक वन पिस चढविला आणि स्कार्फ ने चेहरा लपविला. चावीने घराचा दरवाजा उघडून तिने दागिने चोरले व पुन्हा घर बंद करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. दरम्यान प्रिया हिच्या लक्षात पर्समधील चावी हरवल्याचे लक्षात आल्याने सिमरनला पुन्हा चावी बहिणीच्या पर्समध्ये ठेवता आली नाही. प्रियाने तेवढ्यात आपले घर गाठले असता घराला कुलूप दिसले. कुलूप तोडल्यानंतर आतमध्ये पाहिले असता दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. प्रियाने त्वरीत मानपाडा पोलिस ठाणे गाठत दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करुन सीसीटिव्ही तपासले. या सीसीटिव्हीमध्ये एक महिला आढळून आली. तिच्या पायातील चप्पल पोलिसांच्या निदर्शनास आली होती. प्रिया यांच्या ओळखीतील लोकांना तपासासाठी बोलावले असता सिमरन ही तीच चप्पल घालून आलेली पोलिसांना दिसली. तिच्याकडे चौकशी केली असता तीने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून 20 लाख रुपये किंमतीचे 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.