सुशिक्षित डोंबिवलीत भाजपाला विजयाची खात्री | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

सुशिक्षित डोंबिवलीत भाजपाला एकहाती विजयाची खात्री | भाजपाचे रविंद्र चव्हाण Vs मनसेचे मंदार हळवे आमने सामने 

डोंबिवली शहराची ओळख सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून असली तरी सुशिक्षित मतदारांनीच लोकशाही अधिकाराकडे पाठ फिरवित शहराच्या दुरावस्थेविषयी मनात असलेला असंतोष सोमवारी व्यक्त केल्याचे शहरात घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट झाले.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गेली दहा वर्षे एकाच लोकप्रतिनीधीच्या हाती हा मतदारसंघ असून ते राज्यमंत्रीही आहेत. परंतू दहा वर्षात एकही विकास प्रकल्प या मतदारसंघात पूर्णत्वास गेला नाही.

रस्त्यांची अवस्था इतकी खराब असून यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्र्यांनी 371 कोटी निधी रस्त्यांसाठी आणला अशी घोषणा केल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच माणकोली पूल व ठाकुर्ली पूलाची कामे रखडली असताना ही विकासकामे झाल्याची बतावणी भाजपाच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारात केली.

तर दुसरीकडे मनसेच्या उमेदवारांनी या कामांची पोलखोल करुन सत्य परिस्थितीची जाणीव मतदारांना करुन दिली. यासर्व वातावरणाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून आले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदार संघात 47.96 टक्के मतदान झाले होते. तर यंदाच्या निवडणुकीत 40.72 टक्के मतदान झाले आहे. सात टक्‍क्‍यांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे. 2014 ते 2019 या कालावधीत 11 हजार मतदारांची संख्या वाढूनही यंदा केवळ 1 लाख 44 हजार 983 मतदारांनी मतदान केले. मतदारांची संख्या वाढूनही टक्का मात्र घसरल्याचे चित्र या मतदारसंघात आहे.

2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्षियांनी स्वतंत्र निवडणुक लढविली होती. यावेळी भाजपाचे रविंद्र चव्हाण यांना 56 टक्के मते मिळाली होती, तर सेनेचे दिपेश म्हात्रे यांना 25 टक्के मते मिळाली होती. आघाडीला अवघी 9 टक्के तर मनसेला 8 टक्के मतदान या विभागातून झाले होते. यावर्षी या मतदारसंघातून एकूण 6 उमेदवार निवडणूक रिंगणात असून खरी लढत ही मनसे आणि महायुतीमध्ये असणार असून इतर चार उमेदवारांच्या टक्केवारीवरुनही कोणता उमेदवार विजयी होणार यावर गणित अवलंबून आहे.

भाजपाचे रविंद्र चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग डोंबिवलीत आहे. तसेच संघाचा व इतर भाषिकांचा पाठिंबाही भाजपाकडे आहे. परंतू कोकणी मतदार भाजपाच्या उमेदवारांवर नाराज असून आता समाजाच्या नेत्यापेक्षा दुसऱ्यांना संधी देऊन पाहू असा विचार कोकणी मतदार करीत आहे. मुलभूत समस्यांसोबतच जनतेशी असलेला संपर्क हा आमदारांचा कमी होत असून यामुळेही नाराजीचे वातावरण जनमानसात आहे.

मनसेचे मंदार हळवे हे मनमिळावू आणि शांत स्वभावाचे असल्याने त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडण्याचा मतदारांचा कल गेल्या काही वर्षापासून वाढू लागला आहे. एकदंरीत वातावरण पहाता भाजपाला एकहाती विजयाची खात्री असली तरी त्यांना मनसे अटीतटीची लढत देईल अशी शक्‍यता आहे.

WebTitle: dombivali vidhansabha constituency election results morning updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dombivali vidhansabha constituency election results morning updates