
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील पेंढरकर महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या एमआयडीसी कॉंक्रीटच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पावसात ही परिस्थिती उद्भवत असून याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. जागरूक नागरिक सत्यवान म्हात्रे यांनी मंगळवारी या साचलेल्या घाण पाण्यात पोहण्याचा आनंद घेत अनोखे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. रस्त्याचा मध्यभाग खोलगट केल्याने त्या भागात पाणी साचत आहे, मात्र त्याचा निचरा होण्यासाठी काही केले जात नसल्याने हे आंदोलन नागरिकांनी केले.