डोंबिवली पुन्हा एकदा हादरली कंपनीमध्ये स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

ऋषीकेश चौधरी
Monday, 3 August 2020

स्फोटाच्या आवाजाने डोंबिवली परिसर चांगलाच हादरला आहे. प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाच्या आठवणी डोंबिवलीकरांच्या आजही स्मरणात आहेत. या आवाजाने परिसरातील नागरिक बाहेर घराबाहेर पडले. स्फोटानंतर परिसरात रसायनांचा वास पसरला.

कल्याण, ता. 3 (वार्ताहर) : डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये आज स्फोट झाला. कंपनीतील बॉयलर किंवा रिॲक्टरचा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. रक्षाबंधनाची सुटी असल्यामुळे कंपनीत कामगार उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली; मात्र स्फोटाच्या आवाजाने डोंबिवली परिसर चांगलाच हादरला आहे. प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाच्या आठवणी डोंबिवलीकरांच्या आजही स्मरणात आहेत. या आवाजाने परिसरातील नागरिक बाहेर घराबाहेर पडले. स्फोटानंतर परिसरात रसायनांचा वास पसरला.

पोलिस तपास राजकीय पाठिंब्यावर नाही, तर पुराव्यांवर चालतो! सुशांतसिंग प्रकरणी 'त्यांनी' व्यक्त केले मत...

औद्योगिक परिसरातील अंबर केमिकल कंपनीमध्ये दुपारी चार ते सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली. स्फोटाच्या आवाजाने डोंबिवलीतील नामदेव पद, टिळकनगर परिसरापर्यंत ऐकू आला; मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना सुरुवातीला विजांचा गडगडाट असावा किंवा ट्रान्सफार्मरचा स्फोट झाला असावा, असे वाटले. परिसरातील नागरिक मात्र आवाजाच्या दणक्याने रस्त्यावर आले. ज्या कारखान्यात ही घटना घडली आहे त्या कारखान्याचे पूर्णपणे कोसळले. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या कारखान्यांचेही नुकसान झाले. परिसरातील कारखान्यांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. कारखान्याच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणावर रसायनांचे ड्रम तसेच गॅलन्स् आढळून आले. यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे रसायन आहे, याचा तपास केला जात आहे. 

लॉकडाऊन संपले, अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु झाल्या आणि नव्याने त्रास सुरू झाला...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डोंबिवली भेटीनंतर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर औद्योगिक विकास महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा यंत्रणांनी परिसरातील तीनशे कारखान्यांचे सर्वेक्षण केले होते. यातील 100 हून अधिक कारखान्यांमधून प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर येथील 21 कारखान्यांना काम बंद करण्याचा आदेश बजावण्यात आला. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत उद्योजकांनी कामगारांसह आंदोलनही सुरू केले होते. मार्च महिन्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हे आंदोलन मागे घ्यावे लागले होते. लॉकडाऊन काळात येथील कारखाने बंद होते. मिशन बिगीन अगेननंतर येथे पुन्हा काम सुरू केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कुबट वास आणि रंगीत पाणी वाहू लागल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. 

 

प्रोबेसच्या स्फोटानंतर येथील सुरक्षा व्यवस्थांबाबत अधिक कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. या परिसरातील कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटांमुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका आहे. सरकारच्या संबंधित विभागांनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- राजू नलावडे,
सामाजिक कार्यकर्ते

 

औद्योगिक परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. येथील रासायनिक कारखान्यांचे स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.
- राजेश कदम,
प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dombivli once again rocked the company; Fortunately, no casualties were reported