
डोंबिवलीकरांच्या खिशाला कात्री; शेअर रिक्षाचे सरसकट 15 रुपये भाडे
डोंबिवली : शहरात रिक्षाचालकांनी शेअर भाड्यात वाढ केली असून, प्रवाशांकडून सरसकट १५ रुपये भाडे आकारले जात आहे. रिक्षाचालकांच्या या भूमिकेमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम असून, आता तर हद्दच झाली असल्याची प्रतिक्रिया प्रवासी वर्गाकडून व्यक्त होत आहे. पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत, त्यात रिक्षाचे सातत्याने दुरुस्तीचे काम निघत असल्याने चालकांनी भाडेवाढीची भूमिका घेतली असून, आरटीओच्या नियमांची पायमल्ली करत सरसकट प्रवाशांची लूट सुरू केली आहे. ज्या भागात शेअर भाडे केवळ नऊ रुपये होते, त्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आरटीओ प्रशासन मात्र रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करून दुचाकी, चारचाकी गाड्यांवर कारवाई करत केवळ दंडवसुली करून आपला खिसा गरम करण्याचे काम करत आहेत. डोंबिवलीतील अनेक भागांत रिक्षाचालकांनी शेअर भाडे वाढविले असून, सरसकट प्रवाशांकडून १५ रुपये शेअर भाडे आकारले जात आहे. आयरे रोड, दत्तनगर, गांधीनगर, गणेशनगर, नांदिवली, पी अॅण्ड टी कॉलनी, म्हात्रे नगर, तुकारामनगर आदी परिसरातील प्रवाशांकडून सरसकट १५ रुपये भाडे आकारले जात आहे. आयरे गाव, तुकारामनगर परिसरात आरटीओ नियमानुसार नऊ रुपये शेअर भाडे आहे. रिक्षाचालकांकडे एक रुपया सुट्टा नसल्याने प्रवासी दहा रुपयांची नोट चालकांना देत होते. त्याआधीही शेअर रिक्षाचे भाडे हे आठ रुपये असताना प्रवासी दहा रुपये देत होते. रिक्षाचालकांना एवढे सहकार्य करूनही प्रवाशांची लूट सुरू असून, आता तर हद्दच झाली असल्याची प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. सरसकट सहा रुपयांनी वाढ चालकांनी केली असून, यासाठी प्रवाशांशी ते हुज्जत घालत आहेत. आरटीओ, वाहतूक पोलिसांचा त्यांना कोणताही धाक नसून त्यांच्याकडे तक्रार करण्याविषयी प्रवासी बोलले तरी उलट उत्तर देत चालक प्रवाशांना जुमानत नसल्याचे चित्र आहे.
नेमके चाललेय काय?
आरटीओ प्रशासनाने अद्यापही रिक्षा थांब्यावर, सार्वजनिक ठिकाणी नियमानुसार असलेले दरपत्रक लावलेले नाही. रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. केवळ प्रवासी तक्रारी नोंदवितात, त्याचे पुढे काही होत नाही. आरटीओ प्रशासन नेमके काय करते, असा सवाल विजय चव्हाण यांनी केला आहे. आरटीओ प्रशासनाशी याविषयी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
...तर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक
रिक्षाचालकांनी शेअर भाड्यात वाढ केल्याचा फलक गांधीनगरमध्ये लावला, त्याविषयी तक्रार केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तो फलक हटविला. त्यानंतर अद्याप तेथे कोणतीही कारवाई झाली नाही. अजूनही चालक प्रवाशांकडून वाढीव भाडे घेत आहेत. यापूर्वी आरटीओने वाढीव भाड्यावरून केवळ रिक्षाचालकांना निर्देश दिले, त्याची ठोस कारवाई झाली नाही की मीटर पद्धतीचा कृती आराखडा ठरला नाही. रिक्षाचालकांच्या मनमानीला प्रवासी कंटाळले असून प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची आरटीओ प्रशासन वाट पाहत आहे, असेच चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसते.
Web Title: Dombivlikar Share Rickshaw Fare Is Hike Rs15 Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..