
उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल चालविण्याची कोणतीही तयारी नसल्याचा खुलासा केला. सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेले वेळापत्रक रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या विशेष गाड्यांचे आहे, असेही पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.
मुंबई : सोमवारी बेस्टची सेवा सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेमार्गावर लोकल सुरू होणार असल्याची अफवा समाजमाध्यमावर पसरल्याने काही काळ मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल चालविण्याची कोणतीही तयारी नसल्याचा खुलासा केला. सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेले वेळापत्रक रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या विशेष गाड्यांचे आहे, असेही पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.
मोठी बातमी - मुंबईत शाळांचे ऑनलाईन वर्ग 15 जूनपासून?
23 मार्चपासून मुंबईची लोकल सेवा बंद आहे. मात्र, सोमवार (ता. ८) पासून कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बेस्टची सेवा सुरू झाल्यानंतर लोकल सुरू झाल्याचे मेसेज समाजमाध्यमावर फिरू लागले. पश्चिम रेल्वेने त्याची दखल घेऊन ती अफवा असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले, की व्हायरल होत असलेले वेळापत्रक लोकलचे नाही.
रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या वर्कमॅन स्पेशल गाड्यांचे आहे. त्यातून सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून आदेश येईपर्यंत लोकलची वाहतूक बंदच राहील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.