केईएम-नायरमध्ये 163 जणांना कोव्हिशील्ड लस, अद्याप दुष्परिणाम नाही

भाग्यश्री भुवड
Sunday, 18 October 2020

चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी 20 ते 45 वयोगटातील तीन स्वयंसेवकांना दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांचा भाग म्हणून इंट्रामस्क्युलर डोस दिला गेला. त्यानंतर, 28 सप्टेंबर या दिवशी नायरमध्ये देखील 3 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली. 

मुंबई:  ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड -19 बहुप्रतिक्षित लसीच्या चाचणीची 26 सप्टेंबरपासून किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात सुरूवात झाली. चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी 20 ते 45 वयोगटातील तीन स्वयंसेवकांना दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांचा भाग म्हणून इंट्रामस्क्युलर डोस दिला गेला. त्यानंतर, 28 सप्टेंबर या दिवशी नायरमध्ये देखील 3 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली. 

मात्र, आता या मानवी चाचणीला वेग आला असून गेल्या 22 दिवसांत दोन्ही रुग्णालयांमध्ये 160 हून अधिक स्वयंसेवकांना कोव्हिशील्ड लसीचा डोस देण्यात आला आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत 100 जणांना तर, नायरमध्ये 60 हून अधिक स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, नायरमध्ये दिलेल्या स्वयंसेवकांना अद्याप कोणताही दुष्परिणाम झाला नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं आहे. 

सध्या कोव्हिशील्डची क्लिनिकल चाचणी सुरू असून नायरमध्ये 60 पेक्षा अधिक स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली असून 81 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. शिवाय, आतापर्यंत कोणताही गंभीर असा परिणाम ही लस दिल्यामुळे स्वयंसेवकांना जाणवला आहे, असं निरीक्षण ही डॉ. भारमल यांनी मांडले आहे.

अधिक वाचाः  मुलूंड कोविड केंद्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेला पालिकेची नोटीस

एका महिन्याने त्या स्वयंयेवकांचे अँटीबॉडी तपासले जातील. आता सध्या अॅलर्जिक रिअॅक्शन किंवा काही दुष्परिणाम येत आहेत का याचे निरीक्षण केले जात आहे. पण, अजून तसं काही निदर्शनास आलेलं नाही. एखादी लस दिली की जसे परिणाम दिसून येतात तसेच परिणाम यातही दिसून येत आहेत. त्यामुळे, अद्याप कोणतेही दुष्परिणाम त्यांच्यात दिसले नाहीत. 
डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय आणि प्रमुख पालिका रुग्णालय

केईएममध्ये लवकरच दुसरा डोस

केईएममध्ये ज्या स्वयंसेवकांना कोविशील्डचा डोस देण्यात आला त्यांचा 28 दिवसांचा कालावधी आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे, लवकरच त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 100 जणांना डोस देण्यात आला आहे. शिवाय, त्यांच्या निरीक्षणाबाबत आताच भाष्य करणं चुकीचे ठरेल असे केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

---------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Dose Covishield vaccine 163 people in KEM and Nair no side effects second dose soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dose Covishield vaccine 163 people in KEM and Nair no side effects second dose soon