एकाल तर नवलच! कोरोनाच्या भीतीने मद्यविक्रीत वाढ 

एकाल तर नवलच! कोरोनाच्या भीतीने मद्यविक्रीत वाढ 

मुंबई : कोरोना संसर्गाच्या शक्‍यतेमुळे राज्य सरकारने नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले असून, अनेक आस्थापना आणि ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मद्यविक्री बंद होण्याच्या भीतीने अनेकांनी दारू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मद्यविक्रीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईत बिअरची विक्री जास्त असते, मात्र सध्या विदेशी मद्याची विक्री सुसाट सुरू आहे. व्हिस्की, रम यांचा साठा करण्याकडे मद्यप्रेमींचा ओढा दिसत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारने मद्यविक्री बंद केल्यास तुटवडा भासू नये, याची आपण "काळजी' घेत असल्याचे काही जणांनी सांगितले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यांतील वाईन शॉपमध्ये तुफान मद्यविक्री सुरू असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सरकारने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका मद्यप्रेमींनी घेतली आहे. कंपन्यांनी मद्याचे उत्पादन बंद केल्यामुळे वाईन शॉप, बिअर बारमध्ये जुना साठाच विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

कारवाईसाठी सज्ज 
गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या मद्यविक्रीच्या तुलनेत या मार्चमध्ये मद्याचा खप वाढल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप यांनी दिली. राज्यातील वाईन शॉप बंद करण्याचा निर्णय झाल्यास, अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज आहे. राज्यभरात 45 भरारी पथके नेमण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. 

आळीपाळीने मद्यविक्रीचे आदेश 
मुंबई महापालिका हद्दीतील दुकानांना आळीपाळीने मद्यविक्री करण्याचे आदेश आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. त्यामुळे वाईन शॉपमधील नागरिकांची गर्दी कमी होईल आणि मद्यविक्रीतून मिळणारा महसूल बुडणार नाही, असे प्रशासनाने सांगितले. 

बनावट मद्यविक्रीची शक्‍यता 
कोरोना प्रादुर्भावामुळे मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर घेतला जात आहे. पालघर, नागपूर या जिल्ह्यांतील मद्यविक्री काही प्रमाणात बंद झाली आहे. त्यामुळे बनावट विदेशी मद्यविक्रीचा धंदा जोरात सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

पालघर आणि नागपूर या जिल्ह्यांमधील बार, वाईन शॉप, घाऊक व किरकोळ मद्यविक्री, बिअर शॉप, परमिट रूम बंद आहेत. इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेतले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची गर्दी होऊ नये, असा यामागील उद्देश आहे. 
- कांतिलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग. 

मद्य कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे बाजारात साठा असेपर्यंतच मद्यविक्री होईल. मद्यविक्री बंद होईल, या भीतीने नागरिक अधिक प्रमाणात खरेदी करत आहेत. 
- नरेश शेट्टी, मद्यविक्रेता. 

Drinking alcohol increases fear of Corona 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com