चालकरहित स्वदेशी मेट्रो मुंबईत; बेंगळूरुमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी 

कुलदीप घायवट
Wednesday, 20 January 2021

बहुप्रतीक्षित मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे

मुंबई  : बहुप्रतीक्षित मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. 19) बेंगळूरु येथील भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) प्रकल्पाला भेट दिली. ही मेट्रो गाडी आणि तिच्या निर्मितीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. 27 जानेवारीला स्वदेशी मेट्रो मुंबईत होणार दाखल होणार आहे. 

तब्बल सात वर्षांनंतर मुंबई नवीन मेट्रोच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तिला पाहण्यासाठी मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे. ही मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी होईल. मेट्रो 2 अ आणि सात या मार्गिकांवर धावणारे पहिल्या टप्प्यातील कोच 22 जानेवारी रोजी बेंगळूरुहून मुंबईच्या दिशेने रवाना होतील. 27 जानेवारीपर्यंत ते चारकोप मेट्रो कारशेडमध्ये दाखल होतील, अशी अपेक्षा एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आवश्‍यक असलेल्या तांत्रिक आणि अन्य तपासण्या करून पुढील दोन महिन्यांत या मेट्रोच्या चाचणी फेऱ्या सुरू होतील. मे महिन्यापासून या मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर मुंबई शहरातील पहिली मेट्रो धावली. सात वर्षांनंतर मेट्रो प्रकल्प 2 अ दहिसर ते डी. एन. नगर आणि मेट्रो प्रकल्प 7 अंधेरी पूर्व ते दहिसर या मार्गावरील प्रवासी सेवा कार्यान्वित होत आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या निर्मितीचे काम बीईएमएलकडे सोपवण्यात आले आहे. 

 

पुढील पाच वर्षांत मंबई महानगर क्षेत्रात जवळपास 340 कि.मी. लांबीचे मेट्रो जाळे विस्तारण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. मुंबई आणि सभोवतालच्या शहरांतील प्रवासी सेवा त्यामुळे भक्कम होईल. मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या सेवेला सक्षम पर्याय मिळेल. 
- एकनाथ शिंदे,
नगरविकास मंत्री 

Driverless indigenous metro in Mumbai Inspection by Urban Development Minister Eknath Shinde in Bengaluru

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driverless indigenous metro in Mumbai Inspection by Urban Development Minister Eknath Shinde in Bengaluru