फळ प्रकिया उद्योग डब्यात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

बोर्डी ः चिकू फळांचे उत्पादन घटल्याने फळ प्रक्रिया उद्योगावर गदा येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षभरात वातावरणात घडलेल्या नैसर्गिक बदलांमुळे चिकू फळांचे उत्पादन १० टक्‍क्‍यांवरती येऊन ठेपले आहे

बोर्डी ः चिकू फळांचे उत्पादन घटल्याने फळ प्रक्रिया उद्योगावर गदा येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षभरात वातावरणात घडलेल्या नैसर्गिक बदलांमुळे चिकू फळांचे उत्पादन १० टक्‍क्‍यांवरती येऊन ठेपले आहे. त्यामुळे बागायत आणि शेतीचे व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून विकसित होणाऱ्या फळ प्रक्रिया उद्योगावरही याचे परिणाम होत आहेत.

चिकू फळे झाडावर परिपक्व होण्यासाठी सुमारे आठ ते साडेआठ महिन्यांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात सप्टेंबर २०१८ पासून प्रतिकूल वातावरणामुळे आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे बागायतीतील उत्पादन घटले आहे. पावसाने लवकरच घेतलेला काढता पाय, प्रचंड उष्णता, धुक्‍याची चादर, पाणीटंचाई, एप्रिल तापमान वाढ, वायू वादळ, लांबलेला पाऊस, अतिवृष्टीमुळे चिकू उत्पादनात मोठी घट झाली आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत थंडीच्या हंगामात झाडावरील चिकू फळे पिकण्याचे प्रमाण वाढते. पिकलेल्या चिकूवर प्रक्रिया करून चिकू चिप्स, पावडर, लोणचे, सुपारी, चॉकलेट, बर्फी, चिकूकत्री मिठाई असे अनेक पदार्थ येथील महिला बचत गटांतर्फे तसेच काही उद्योजक महिलांतर्फे तयार करतात. त्यांची बाजारात विक्रीही करतात. फळातील औषधी गुण लक्षात घेऊन ग्राहकांची प्रक्रिया केलेल्या पदार्थांना पसंती मिळते; मात्र वर्षभरात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटांमुळे चिकू उत्पादन घटल्याने औषधालाही चिकू मिळणे कठीण झाले आहे.

अद्ययावत तंत्रज्ञान अवलंबून आणि १० महिलांना एकत्र करून चिकू प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. चिकू चिप्स, पावडर, लोणचे, चॉकलेट अशा विविध प्रकारचे पदार्थ आम्ही तयार करतो; मात्र यंदा बेसुमार पाऊस झाल्याने चिकूचे उत्पादन घटले आहे. याचा फटका प्रक्रिया उद्योगाला बसणार आहे.
लतिका पाटील, उद्योजक, गोल्ड ऑर्चिड चिकू प्रक्रिया.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to natural changes in the crop, the production of chiku is 5% in Dahanu