esakal | कोरोना, नियम, अटी-शर्थी! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये कमालीची घट; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना, नियम, अटी-शर्थी! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये कमालीची घट; वाचा सविस्तर

कोरोनाच्या महामारीमुळे या उत्सवावर संकट कोसळले आहे. कोविड 19 च्या नियमांमुळे चाकरमान्यांना आता गावी जाण्यासाठी सुद्धा नियम अटी लागू झाल्याने, कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत यावर्षी प्रचंड घट झाली आहे.

कोरोना, नियम, अटी-शर्थी! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये कमालीची घट; वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रशांत कांबळे


मुंबई : कोकणातील गौरी गणपतीच्या उत्सवाला गावी जाण्यासाठी मुंबई उपनगरातील चाकरमानी दरवर्षी एक महिन्यापूर्वीच तयारी करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे या उत्सवावर संकट कोसळले आहे. कोविड 19 च्या नियमांमुळे चाकरमान्यांना आता गावी जाण्यासाठी सुद्धा नियम अटी लागू झाल्याने, कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत यावर्षी प्रचंड घट झाल्याचे दिसून येत असून, त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर सुद्धा होण्याची शक्यता आहे.

परप्रांतीयांना न्याय, कोकणावर अन्याय! विशेष रेल्वे गाड्यांचा मुद्दा जाणार 'राज' दरबारी!

राज्य परिवहन महामंडळाने गेल्या वर्षी 2019 मध्ये 3510 बसेसचा वापर करून सुमारे 11522 फेऱ्या सोडल्या होत्या. त्यामधून सुमारे 5.37 लाख प्रवाशांनी गणपती उत्सवासाठी आपल्या गावी जाणे-येणे केले होते. यामधून तब्बल 11 कोटी 28 लाख रुपयांचा महसूल एसटीने मिळवला होता. त्यानंतर यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिण्यापासून आधीच नियमित प्रवासी वाहतुकीचे उत्पन्न बुडाले असतांना आता, गणपती उत्सवाचा हंगाम सुद्धा घटणार असल्याची शक्यता आहे.

यावर्षी 6 ऑगष्ट पासून गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात सोडण्यात येत असून, 50 टक्केच प्रवाशांना वाहून नेल्या जात आहे. त्यामध्ये कोव्हिड नियम अटींची भर पडल्याने अनेक चाकरमान्यांनी कोकणात जाणे टाळले असल्याचे दिसून येत आहे. 6 ते 12 ऑगष्ट पर्यंत सुमारे 416 बसेस कोकणासाठी सोडण्यात आले आहे. तर एकूण 11 हजार लोकांनी आतापर्यंत कोकणात जाण्या-येण्यासाठी 12 ऑगस्ट पर्यंत बुकिंग केली आहे. त्यातील 8 हजार प्रवासी कोकणात पोहचले असून, आतापर्यंत एसटीचे फक्त आता 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवता आले आहे. 

समुद्रात मुर्ती विसर्जनाबाबत आली सर्वात मोठी बातमी; जाणून घ्या BMC ने काय दिल्या आहेत सूचना

एसटीने गेल्यावर्षी गौरी गणपती हंगामात तब्बल 11 कोटी 28 लाखांचे उत्पन्न मिळवले होते. त्यातुलनेत यावर्षी सुमारे 2 कोटींपर्यंत  उत्पन्न होणार नसल्याचा अंदाज एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, सुमारे 9 कोटीचे उत्पन्न बुडण्याची शक्यता सुद्धा एसटीच्या अधिकाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )