Dussehra Melava : दसरा मेळाव्यावरुन महापालिकेवर वाढला दबाव; शिवसेनेनं थेट लेखीच मागितलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC-Mumbai

दसरा मेळाव्यावरुन BMCवर वाढला दबाव! शिवसेनेनं थेट लेखीच मागितलं उत्तर

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन आता मुंबई महापालिकेवर दबाव वाढला आहे. कारण शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांनी महापालिकेला एक पत्र लिहून परवानगी का देण्यात येत नाही, याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याची मागणी केली आहे. (Due to Dussehra Melava pressure on BMC increased Shiv Sena directly asked for written answer)

शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर आर्थात शिवाजी पार्क मैदानातच घेणार असल्याचं म्हटलं आहे. पण यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या गटानं महापालिकेकडं परवानगी मागितली होती. पण त्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याचाच जाब दादर विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद वैद्य, महेश सावंत आणि इतर पदाधिकारी यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं तसेच आम्ही आधी अर्ज केलेलं असतानाही परवानगी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

यावर आयुक्तांनी उत्तर दिलं की, हे सर्व प्रकरण विधी व न्याय विभागाकडं आहेत. त्यामुळं याबाबत आमच्याकडे कोणताही निर्णय झालेला नाही. यानंतर शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी या पत्रामार्फत आयुक्तांना थेटपणे विचारलं की तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्यावं. कारण जर आम्हाला कोर्टात जावं लागलं तर महापालिकेचं अधिकृत दाखला आम्हाला देता येईल.

मिलिंद वैद्य म्हणतात, दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. आम्ही पत्र दिल्यानंतर आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं की, संध्याकाळपर्यंत तुम्हाला परवानगी देण्यात येईल. पण आज इतके दिवस झाले तरी अनेकदा चौकशी केल्यानंतर आम्हाला काहीच प्रत्युत्तर आलेलं नाही. त्यामुळं आम्ही आता त्यांना थेट विचारलं. त्यावर त्यांनी विधी खात्याकडं हे प्रकरणं असल्याचं सांगितलं.