प्रवासाची घाई; पण बसच नाही!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

वसई ः वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे; मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी बुधवारी (ता.१५) सकाळी ५ पासून बस बंद करत वसई पूर्वेला संपाची हाक दिली. त्यामुळे रोज बसने ये-जा करणाऱ्या १ लाख प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागले. 

 

वसई ः वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे; मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी बुधवारी (ता.१५) सकाळी ५ पासून बस बंद करत वसई पूर्वेला संपाची हाक दिली. त्यामुळे रोज बसने ये-जा करणाऱ्या १ लाख प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागले. संप मागे घेण्यासाठी दुपारी ठेकेदार, परिवहन सभापतींनी कामगारांसोबत चर्चा केली.

 स्टार्टअप ही दाखवताहेत...कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता!

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा गेली आठ वर्षे प्रवाशांना सुविधा देत आहे. भगीरथ ट्रान्सपोर्ट या खासगी ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे; मात्र कामगारांच्या म्हणण्यानुसार वर्षभरापासून वेतन देताना दिरंगाई केली जात आहे. दोन टप्प्यात वेतन मिळते. सणासुदीलादेखील हीच परिस्थिती असते. त्याचबरोबर भविष्यनिर्वाह निधीची कपात वेतनातून होत असली, तरी ठेकेदार भविष्यनिर्वाह रक्कम सरकारला अदा करत नाही. कामगारांची पतपेढी आहे; परंतु कमी व्याजदरात कर्ज देण्याचे कारण सांगून पैसे कापले जातात; परंतु अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. ठेकेदार पैसे देताना हात आखडता घेत आहे. 

कोकणचा... प्रवास होणार सुखकर, झालीये ही चाचणी

रोज परिवहन सेवेच्या बसमधून प्रवाशांना कामगार सुविधा देण्याचा प्रयत्न करत असताना कामगारांना मात्र असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या पदरी केवळ आश्‍वासनांची खैरात पडत असून पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, असे कामगार प्रवीण देवरुखकर यांनी सांगितले. 
एकूण ७०० कामगारांनी संपात सहभाग घेतला. ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही’, ‘आमचे हक्काचे वेतन आम्हाला मिळाले पाहिजे, आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देत या वेळी कामगारांनी परिसर दणाणून सोडला.

यातून चर्चेने तोडगा काढण्यासाठी परिवहन सभापती प्रीतेश पाटील, माजी सभापती भरत गुप्ता, भगीरथ ट्रान्स्पोर्टचे संचालक मनोहर सकपाळ, व्यवस्थापक तुकाराम शिवणकर यांनी कामगारांशी चर्चा केली; मात्र या वेळी सकपाळ यांचा पारा चढल्याने कामगार पुन्हा संतप्त झाले. वातावरण अधिक चिघळू नये म्हणून, पाटील व गुप्ता यांनी कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला फक्त आश्‍वासन दिले जात आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. वेळेवर वेतन मिळत नसल्याने घराची आर्थिक जुळवाजुळव करणे अशक्‍य होते. घाम गाळून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांकडे ठेकेदार लक्ष देत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. एकजुटीने संप पुकारला आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी मांडली. 
प्रवीण देवरुखकर, 
कामगार परिवहन सेवा 

ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर द्यावे; तसेच अन्य मागण्या पूर्ण कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनीदेखील वेतन वेळेवर देण्यात यावे, असे ठणकावून सांगितले आहे. कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी महापालिका घेईल. 
प्रीतेश पाटील, 
सभापती, परिवहन समिती 

कर्मचाऱ्यांना महिन्याला वेतन दिले जाते. फक्त तारीख पुढे-मागे होत असते. भविष्यनिर्वाह निधीबाबत देखील लवकरच कार्यवाही करू. तसेच अन्य मागण्यांकडे लक्ष देऊन कामगारांची अडचण दूर केली जाईल. 
मनोहर सकपाळ, 
संचालक, भगीरथ ट्रान्स्पोर्ट, परिवहन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to transport workers stike passengers faces so many problems in Vasai