‘स्टार्टअप’ही दाखवताहेत... कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता!

‘स्टार्टअप’ही दाखवताहेत... कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता!
‘स्टार्टअप’ही दाखवताहेत... कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता!

मुंबई : खर्च कमी करण्यासाठी स्टार्टअप व्यवसायांनी कर्मचारीकपातीचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांना ‘पिंक स्लिप’ देणाऱ्या या बड्या स्टार्टअप्समध्ये ओयो, ओला, पेटीएम, क्‍विकर, झोमॅटो आणि रिव्हिगो यांचा समावेश असल्याचे समजते.

मागील आर्थिक वर्षात ओलाने कर्मचाऱ्यांच्या लाभांत २० टक्के कपात केली आणि सुमारे आठ टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. सप्टेंबर २०१९ मध्ये झोमॅटोने जवळपास ६०० म्हणजे १० टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. हाच ‘ट्रेंड’ विकसित होणारे आणि नव्याने सुरू झालेले व्यवसायही स्वीकारण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते. त्यामुळे सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांचे वेतन ‘पॅकेज’ बाधित होईल, अशी शक्‍यता एका गुंतवणूकदाराने व्यक्त केली. परवडणाऱ्या दरांत पर्यटकांना हॉटेल निवासव्यवस्था पुरवणारे ओयो स्टार्टअप या महिन्यातच २००० कर्मचाऱ्यांची छाटणी करील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार चीन आणि भारतात सुमारे १२ टक्के कर्मचारी कपात करण्यात आली आहे. ओलानेही काही महिन्यांत सुमारे आठ टक्के कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. पेटीएम या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मने पाच ते सात टक्के कर्मचारी कपात केल्याचे सांगण्यात येते. 

मागील सप्टेंबरमध्ये झोमॅटोने ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले; तर वाहतूक क्षेत्रातील रिव्हिगो कंपनीने ७० ते १०० कर्मचाऱ्यांना घरी बसवले. गेल्या महिन्यात क्‍विकरने तर तब्बल १००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. फ्लिपकार्टनेही कर्मचाऱ्यांची भरती बंद करून अंतर्गत बढत्यांद्वारे रिक्त जागा भरण्याचे धोरण स्वीकारले आहे. स्टार्टअप व्यवसायांच्या वेतनावरील खर्चात प्रचंड वाढ झाली होती. या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी विक्री, ग्राहक साहाय्य आणि विपणन या विभागांतील मनुष्यबळाला कात्री लावण्याचे धोरण घेतले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि पदोन्नती प्रक्रियेलाही त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या वर्षी वेतनवाढ ७ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित असेल, असे सांगण्यात येते.

स्विगीने मागील वर्षी १२९७ कोटींचे उत्पन्न मिळवले; मात्र त्यातील ४० टक्के रक्कम वेतनावर खर्च झाली. ड्रीम११ या गेमिंग कंपनीच्या ७७५ कोटींच्या महसुलातील ९ टक्के रक्कम वेतनापोटी गेली. स्टार्टअप व्यवसायांसाठी उत्पन्नातील सरासरी १५ टक्के रक्कम वेतनावर खर्च होते. दरम्यान, याच काळात स्नॅपडील आणि ओला यांच्या वेतनखर्चात मात्र घट झाल्याचे आढळते.

दृष्टिक्षेपात
- एक अब्ज डॉलरहून अधिक मूल्य असलेल्या भारतातील प्रमुख ११ ग्राहक तंत्रज्ञान 
व्यवसायांचा वेतनावरील खर्च २०१८ मधील ५०८६ कोटींवरून २०१९ मध्ये ८८६० कोटी रुपयांवर.  
- काही वर्षांत १० ते १२ स्टार्टअप व्यवसायांची शेअर बाजारांत नोंदणी; त्यापैकी ७० टक्के कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत मोठी घसरण.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com