कसं मिळणार ऑनलाईन शिक्षण ? मोबाईल नसल्याने होताहेत विदयार्थी आत्महत्या

तेजस वाघमारे
Thursday, 8 October 2020

ऑफलाईन शिक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी : शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे मत
 

मुंबई, ता. 8 : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकारने शालेय विद्यार्थाना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु ऑनलाइन शिक्षणासाठी शैक्षणिक साधने उपलब्ध नसल्याने देशातील वेगवेगळ्या राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. हे वास्तव लक्षात घेऊन मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने ऑफलाईन शिक्षणाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

देशभरातील विविध राज्यातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती हेरंब कुलकर्णी यांनी संकलित केली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पंजाब, गुजरात, कर्नाटक या राज्यात आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील सांगली आणि सातारा जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेले हे विद्यार्थी नववी ते बारावी या वयोगटातील असून बहुतेक जणांचे पालक शेतकरी शेतमजूर व कोरोना काळात बेरोजगार झालेले आहेत. त्यातून घरखर्च चालवताना असा मोबाईलचा खर्च परवडत नसल्याने ते ऑनलाइन शिक्षण मुलांना देऊ शकते नाहीत, असे निरीक्षण कुलकर्णी यांनी नोंदविले आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई पोलिसांचा सनसनाटी खुलासा, उध्वस्त केलं चॅनल्सचं 'फेक TRP रॅकेट', रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी

तामिळनाडूतील एकाच कुटुंबात तीन मुलींमध्ये एकच मोबाइल होता. त्यातून तणाव घेऊन एका मुलीने आत्महत्या केली तर म्हैसूर जवळ येईल एका मुलीच्या आई वडिलांचे काम सुटले त्यातून पैसे नसल्याने मोबाईल घेऊ शकले नाहीत. यातुन त्या मुलीने आत्महत्या केली. हे वास्तव लक्षात घेऊन सरकारने ऑनलाइन शिक्षणाबरोबरच ज्या मुलांकडे मोबाईल नाही त्यांच्यासाठी स्वाध्याय पुस्तिका छापून वितरित करणे रेडिओ टीव्हीवरून शिक्षणात वेळ वाढवावा, असा पर्याय सुचविला आहे.

तसेच अनेक शिक्षक व संस्था 5 ते 10 विद्यार्थ्यांना घेऊन शिकवत आहेत. यावर भर द्यायला हवा. त्याच बरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांची शिक्षकांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चौकशी करणे, समुपदेशन करणे व पालकांशी बोलणे अशा गोष्टीही करायला हव्यात, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

मुलांमध्ये न्युनगंडाची भीती : 

आत्महत्येबरोबर मोबाइल नसलेल्या मुलांमध्ये तीव्र न्युनगंड निर्माण होणार आहे. त्यातून शाळा सोडून देण्याचे प्रमाणही खूप वाढेल. तसेच शाळेत आल्यावर ऑनलाइन शिक्षण घेतलेले आणि न घेतलेले असे दोन प्रकारचे विद्यार्थी असतील. या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करणे हे नवेच आव्हान शाळांपुढे निर्माण होईल या गरीब मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई पोलिसांचा सनसनाटी खुलासा, उध्वस्त केलं चॅनल्सचं 'फेक TRP रॅकेट', रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी

केरळमध्ये 66 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ?

एकट्या केरळमध्ये मार्च महिन्यापासून 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील कारणांचे तपशील स्पष्ट नसले तरीही ऑनलाइन शिक्षण हे त्यातील अनेक आत्महत्यांचे कारण असू शकते, असा दावा कुलकर्णी यांनी केला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

due to unavailability of mobiles and tabs students are taking extreme steps


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to unavailability of mobiles and tabs students are taking extreme steps