मेट्रो ट्रेन तोडते मुंबईकरांच पाणी

मेट्रो ट्रेन तोडते मुंबईकरांच पाणी

मुंबई : सध्या शहरभर मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे; मात्र मुंबईकरांसह पालिकेला त्याचा चांगलाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहेच. त्याचबरोबर जलवाहिन्याही फुटत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो लिटर पाणी वाया जाते ते वेगळेच. मेट्रोच्या कामामुळे तीन वर्षांत तब्बल 25 वेळा जलवाहिन्या फुटल्या आहेत. राहिवाशांबरोबर पालिकेलाही त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

कुलाबा ते दहिसर आणि ठाण्यापर्यंत मेट्रोची कामे सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी निष्काळजीपणे काम केल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या अनेकदा फुटल्या आहेत. गेल्या आठवड्यात वेरावली जलाशयातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने अंधेरी पूर्व-पश्‍चिम आणि जोगेश्‍वरी परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. 

मेट्रोचे काम करत असताना कोणती काळजी घ्यायची, याच्या सूचनाही पालिका प्रशासनाने एमएमआरडीए प्राधिकरणासोबत बैठक घेऊन दिल्या होत्या. पालिकेने मेट्रोला पुरवलेला जलवाहिन्यांचा नकाशा पाहूनच खोदकाम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या; मात्र मेट्रो प्राधिकरणाने त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे 2017 ते 2019 अशा तीन वर्षांच्या कालावधीत फोर्ट, वांद्रे, अंधेरी, गिरगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, परळ, दादर, वरळी आदींसह अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या. परिणामी उपनगरांतील पाणीपुरवठा अनेकदा बंद ठेवावा लागला. एखादी जलवाहिनी फुटल्यानंतर मेट्रोकडून पालिकेला कळवले जात नाही. अनेक प्रकरणांत रहिवाशांनी तक्रार केल्यानंतरच पालिकेला त्याची माहिती होते. पालिकेने वेळोवेळी त्याबाबत दंडात्मक कारवाईही केली आहे. 

पालिका वसूल करणार खर्च 

मेट्रोसाठी खोदकाम करताना तीन मीटरपर्यंत चाचणी घेऊन जलवाहिनी, दूरध्वनी वाहिनी किंवा विद्युतवाहिनी नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच मशीनने खोदकाम सुरू केले जाते; मात्र अनेक जलवाहिन्या तीन मीटरपेक्षा खाली आहेत. जलवाहिन्या फुटल्यामुळे दुरुस्तीला आलेला खर्च आणि वाया गेलेले पाणी याचा खर्च मेट्रो प्राधिकरणाकडून वसूल केला जातो. वेरावली जलवाहिनीच्या दुरुस्तीचा खर्चही पालिका आढावा घेऊन वसूल करणार आहे. 


मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळेच वेरावली जलाशयातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. मेट्रोच्या कामांमुळे जलवाहिन्या फुटल्या त्या वेळी आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. आताही आमच्या बैठका सुरू असून दंडात्मक कारवाईचा विचार सुरू आहे. 
- अजय राठोड, मुख्य जलअभियंता, पालिका 
 

web title : Due to the work of the metro, 25 times in 3 years,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com