ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 165 दिवसांवर, रिकव्हरी रेटही 92 टक्के

शर्मिला वाळुंज
Tuesday, 27 October 2020

कोरोनाच्या पार्श्वूमीवर शहरात दिलासादायक चित्र उभे राहत आहे. शहरात आजघडीला रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण आता 135 वरून 165 वर गेले आहे. जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या मानाने ठाणे पालिका जास्त चाचण्या करीत असतानाही ऑक्‍टोबरमध्ये रुग्ण वाढीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोरोनाचा अटकाव करण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. करोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचार देता यावेत आणि शहरातील कोरोनाची साखळी तोडता यावी, या उद्देशातून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. 

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वूमीवर शहरात दिलासादायक चित्र उभे राहत आहे. शहरात आजघडीला रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण आता 135 वरून 165 वर गेले आहे. जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या मानाने ठाणे पालिका जास्त चाचण्या करीत असतानाही ऑक्‍टोबरमध्ये रुग्ण वाढीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोरोनाचा अटकाव करण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. करोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचार देता यावेत आणि शहरातील कोरोनाची साखळी तोडता यावी, या उद्देशातून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. 

क्लिक करा : ठाणे जिल्ह्यातील कोरोना आटोक्‍यात! 8 हजार रुग्ण बरे 

मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टशिवाय सप्टेंबर महिन्यातही कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढताना दिसली. सप्टेंबर महिन्यात 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी 8 हजाराहून अधिक रुग्ण बरे देखील झाले. ठाण्यात प्रतिदिवस कोरोना चाचणी प्रमाण वाढून ते 5594 च्या घरात आले आहे. तर दुसरीकडे त्यामध्ये नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही आता घटले आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 92 टक्‍यांवर आले आहे. याशिवाय मृत्युदरही आता 2.49 टक्‍यांवर आला आहे. 

विशेष म्हणजे ऑक्‍टोबरमध्ये रुग्ण वाढीचे प्रमाणही आता कमी झाले आहे. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून ती 250 वरून 130 वर आली आहे. सप्टेंबर महिन्यात हेच प्रमाण 300 च्यावर होते. तर, सप्टेंबर महिना अखेरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के होते. ते आता 92 टक्‍यांवर आले आहे. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आणि त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. 

अधिक वाचा : मुंबईतून कोरोनाची साथ गेली ? रुग्णदुपटीचा कालावधी 139 दिवसांवर

दररोजच्या चाचण्या दुप्पट 
ठाण्यात एका रुग्णामागे 44 जणांना क्वॉरन्टाईन केले जात आहे. ऑगस्ट महिन्या अखेरपर्यंत रोज सरासरी 2300 चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यामध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. सप्टेंबर महिन्यापासून चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवसाला 5500 हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यात 400 च्या आसपास रुग्ण आढळून येते होते. 

जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट 
ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मंगळवारी 693 रुग्णांसह 21 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या दोन लाख आठ हजार 285 वर गेली आहे. मृतांची संख्या आता पाच हजार 261 झाली आहे. 

  • ठाणे शहरात 189 बाधितांसह चार जणांचा मृत्यू
  • नवी मुंबईत 121 रुग्ण, तीन जणांचा मृत्यू
  • कल्याण-डोंबिवलीत 130 रुग्ण. तीन जणांचा मृत्यू
  • मिरा-भाईंदरमध्ये 129 रुग्णांसह दोन जणांचा मृत्यू
  • भिवंडीत 15 बाधिततांसह एकाचा मृत्यू
  • उल्हासनगरात 30 रुग्णांची, एकाचा मृत्यू
  • अंबरनाथमध्ये 16 रुग्णांसह एकाचा मृत्यू
  • बदलापूरमध्ये 31 रुग्णसह एकाचा मृत्यू
  • ठाणे ग्रामीणमध्ये 32 रुग्णांसह पाच जणांचा मृत्यू
  • जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 16 हजार 574, तर मृतांची संख्या 514

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The duration of patient doubling is 165 days and the recovery rate is 92 percent in Thane