धारावीत कोरोनानंतर धुरळा; रस्ता खोदकामामुळे नागरिकांचे आजार वाढले

धारावीत कोरोनानंतर धुरळा; रस्ता खोदकामामुळे नागरिकांचे आजार वाढले


मुंबई : धारावीजवळील माटुंगा लेबर कॅम्पमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पालिकेने दिवाळीपूर्वी हाती घेतले. या कामासाठी रस्ता दुतर्फा खोदला असल्याने याची माती रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकण्यात आली आहे. वर्दळीचा मार्ग असल्याने वाहनांमुळे धूळ उडत असून, विभागात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पादचारी आणि रहिवासी आजारी पडू लागले आहेत. कोरोनानंतर रहिवाशांना धुळीशी सामना करावा लागत असून, याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. 

पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने डॉ. आंबेडकर मार्गावर दुतर्फा जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. दिवाळीपूर्वी पालिकेने हे काम हाती घेतले. यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने रस्त्यावर दोन्ही बाजूने खोदकाम केले आहे. याची माती रस्त्यात टाकल्याने या मार्गावरून येणाऱ्या सततच्या वाहनांमुळे धूळ हवेत उडत आहे. याचा त्रास या मार्गजवळील इमारती, चाळी आणि पादचाऱ्यांना होत आहे. ठिकठिकाणी काम अपूर्णावस्थेत असल्याने येथे वाहनांची मोठी कोंडी होत आहे. यातून वाहनचालकांमध्ये वाद होऊ लागले आहेत. 
हा परिसर कोरोनाचा हॉट स्पॉट ठरला होता. यातून लोक सावरत असतानाच आता अपूर्णावस्थेत असलेल्या कामाच्या धुळीमुळे लोकांना खोकला, सर्दी असे आजार होऊ लागले आहेत. या कामाचा ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे; मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. 

दर दोन वर्षांनी हीच परिस्थिती येते. आंबेडकर मार्गावर दर दीड-दोन वर्षांनंतर खोदकाम करण्यात येते. या धुळीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे. सर्दी, घसा खवखवत असल्याने आठ दिवस आजारी आहे. महापालिकेने तातडीने याकडे लक्ष द्यावे. 
- प्रवीण देठे,
रहिवासी 

दिवाळीपूर्वी रस्ता खोदला आहे. काम नियोजनशून्य पद्धतीने करण्यात येत आहे. खोदकामाची माती रस्त्यावर टाकली आहे. यामुळे वाहनांना अडथळा येतो आहेच; पण धुळीने नागरिक आजारी पडत आहेत. याबाबत नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. हे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी पालिकेचे सहायक आयुक्त यांना पत्र दिले आहे. हे काम तातडीने पूर्ण न केल्यास महापालिकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करू. 
- सुनील कांबळे,
प्रभाग अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी 

Dust after corona in Dharavi Road excavations increased the illness of the citizens

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com