हुश्श! ई-पास रद्दमुळे पोलिसांचा ताण कमी; महिन्याला तब्बल दोन लाख पास होत असे जारी

प्रशांत कांबळे
Wednesday, 2 September 2020

लॉकडाऊनच्या काळात राज्यात दर महिन्याला किमान दोन लाख ई पास जारी होत असे. आता ई-पास रद्द केल्यामुळे पोलिसांवरील मोठा ताण कमी झाला आहे.

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यात दर महिन्याला किमान दोन लाख ई पास जारी होत असे. आता ई-पास रद्द केल्यामुळे पोलिसांवरील मोठा ताण कमी झाला आहे.

ऑनलाईन न्यायालयांत अडथळ्यांची शर्यत! पायाभूत सुविधांचा अभाव; वकील, पक्षकारांची गैरसोय 

सुरूवातीच्या कठोर लाॅकडाऊननंतर त्यात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली. अटी-नियमांनुसार प्रवासाला, उद्योगांना  परवानगी देण्यात आली. प्रवासासाठी ई-पास गरजेचा करण्यात आला.  देशभरात सामान किंवा प्रवासी वाहतुकीसाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे 22 ऑगस्टरोजी केंद्र सरकारने स्पष्ट केले. तर, राज्य सरकारने 2 सप्टेंबरपासून आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची तरतुद रद्द केली आहे. त्यामुळे पोलिसांवरीलही मोठा भार हलका झाला आहे.  राज्यात आतापर्यंत 8 लाख 17 हजार ई-पास पोलिसांनी जारी केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण दर महिन्याला अडीच ते तीन लाख होते. त्यामुळे कोरोना काळातील बंदोबस्तासह पोलिसांवर याचाही मोठा ताण होता. 

अशी होती यंत्रणा
कोरोना काळात प्रवासासाठी राज्यात दर महिन्याला किमान दोन लाख पास बनवले जात. त्यासाठी प्रत्येक विभागात नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त दर्जाच्या अधिका-याची नेमणूक होती. त्याशिवाय पडताळणीसाठी पोलिस ठाण्याच्या पातळीवर दोन कर्मचारी होते. ई-पाससाठी मुंबईत किमान 80 पोलिस कार्यरत होते. कायदा व सुव्यवस्थेसोबत गुन्ह्यांची उकल करणा-या पोलिसांवरील हे अतिरिक्त काम आता कमी झाले आहे. 

ई-पासचा काळाबाजार
ई-पास सुविधमध्ये अनेकांनी त्यांचा काळाबाजारही करण्यास सुरूवात केली होती. बनावट ई-पास बनवणा-या अनेक टोळ्यावरही पोलिसांनी या काळात कारवाई केली. बनावट ई-पाससाठी पाच हजार व वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपये घेतले जात. सुरूवातीच्या काळात बनावट पास बनावण्यासाठी 10 हजारांपर्यंतही रक्कम आकारण्यात आली.

लॉकडाऊनच्या तडाख्यातून वाहन क्षेत्र सावरतंय; विक्रीत झालीये इतकी वाढ...

गणेशोत्सवात कमी प्रतिसाद
मुंबई पोलिसानी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला होता. अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत होती. त्याच्यासोबत गणेशोत्सवाचा पर्यायही सामील करण्यात आला होता. पण त्यासाठी केवळ पाच हजार अर्जच मुंबई पोलिसांना प्राप्त झाले.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-pass cancellation eases police stress; Two lakh passes are issued every month