esakal | मुंबई विमानतळ गैरव्यवहारप्रकरणः सीबीआयच्या गुन्ह्यानंतर ईडीकडूनही पडताळणी
sakal

बोलून बातमी शोधा

mumbaiairport

ईडी सध्या सीबीआने दाखल केलेला गुन्हा व पुराव्यांची पडताळणी करत असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी बोगस वर्क ऑर्डरच्या मदतीने नऊ कंपन्यांमार्फत गैरव्यवहारातील पैसा वळवण्यात आल्याचा आरोप सीबीआयच्या तक्रारीत करण्यात आला आहे.

मुंबई विमानतळ गैरव्यवहारप्रकरणः सीबीआयच्या गुन्ह्यानंतर ईडीकडूनही पडताळणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) गुन्हा दाखल केल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयही(ईडी) याप्रकरणाची पडताळणी करत आहेत. याप्रकरणात मनी लाँडरीग झाली का? याबाबत ही पडताळणी करण्यात येत असल्याचे ईडीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ईडी सध्या सीबीआने दाखल केलेला गुन्हा व पुराव्यांची पडताळणी करत असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी बोगस वर्क ऑर्डरच्या मदतीने नऊ कंपन्यांमार्फत गैरव्यवहारातील पैसा वळवण्यात आल्याचा आरोप सीबीआयच्या तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपाबाबत ईडी पडताळणी करत आहे. ईडी ही यंत्रणा मनी लाँडरीग प्रकरणात तपास करणारी विशेष केंद्रीय यंत्रणा आहे.

याप्रकरणातील तक्रारीनुसार, मुंबई एअरपोर्टच्या सभोवताली २०० एकर जागा होती. ती जागा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला विकासासाठी देण्यात आली होती. त्यासाठी विविध कंपन्यांसोबत कंत्राट करून त्याचे पैसे त्यांना देण्यात आले. पण ही कामे प्रत्यक्षात झालीच नाही. बनावट वर्क ऑर्डरच्या मदतीने हे ३१० कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला नुकसान झाले.

सीबीआयच्या गुन्ह्यानुसार याप्रकरणी ७०५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात एमआयएएल नावाची जॉईंट व्हेंचर कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिग्ज लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी इंडिया व इतर काही विदेशी कंपन्यांनी तयार केली होती. यात जीव्हीकेचे ५० टक्के शेअर्स होते, एएआयचे २६ टक्के शेअर्स होते. तर उर्वरित शेअर्समध्ये इतर कंपन्यांकडे होते. याप्रकरणी सीबीआयनं जीव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी, मुलगा जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह गैरव्यवहारात सहभागी असलेल्या ११ आरोपी कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला, ही बाब आश्चर्चकारक असल्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. याप्रकरणी तपासात यापूर्वीही यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड पारदर्शक व जबाबदार कंपनी असून ती यंत्रणेला तपासात सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे