आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाच कसा? ;चौकशी करा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

चालू शैक्षणिक वर्षात एकट्या जव्हार आदिवासी प्रकल्पातील आश्रमशाळांमधील आठ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी समोर आणली आहे. कोठडीतील मृत्यू समजून या प्रकरणांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली.

मोखाडा : सरकारी आश्रमशाळांमध्ये आवश्‍यक सोई-सुविधा नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची अवस्था गोठ्यातील जनावरांसारखी आणि कोठडीतील कैद्यासारखी झाली आहे, अशी व्यथा आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केली आहे. शैक्षणिक वातावरण नसल्याने विद्यार्थ्यांची मानसिकता ठीक राहत नाही; त्याचा परिणाम म्हणून शैक्षणिक वर्षात एकट्या जव्हार आदिवासी प्रकल्पातील आश्रमशाळांमधील आठ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब त्यांनी समोर आणली आहे. कोठडीतील मृत्यू समजून या प्रकरणांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली. 

ही बातमी वाचली का? पुर्नवसनासाठी ठाण्यात कातकरींनी मांडला बिऱ्हाड
 
आदिवासी समाज साक्षर व्हावा म्हणून सरकारने १९७२ मध्ये आश्रमशाळांत निवासी शिक्षणाची व्यवस्था केली. स्वच्छंदी शैक्षणिक वातावरणात शिक्षण मिळावे म्हणून नियमावली तयार केली. परंतु ४८ वर्षे उलटूनही आदिवासी आश्रमशाळांमध्ये आवश्‍यक सोई-सुविधा मिळत नाहीत. विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारलेले मुख्याध्यापक, अधीक्षक आश्रमशाळेत राहत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे, असे पंडित म्हणाले. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसारख्या घटनांची माहिती २४ तासांच्या आत आयोगाला कळवावी, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर मृतदेहाचा पंचनामा करावा, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करावे, पंचनामा आणि शवविच्छेदनाचे व्हिडीओ चित्रीकरण करावे. आत्महत्यांसाठी मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना जबाबदार धरावे, अशा मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

ही बातमी वाचली का? सर्वांना परवडणारी घरे उभी करा- शिंदे

तीन वर्षांत २८२ विद्यार्थ्यांचा मृत्यू
राज्यातील ५२९ सरकारी आश्रमशाळांमध्ये एक लाख ९१ हजार ५६१ विद्यार्थी आहेत. अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख ५३ हजार ८९१ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या निम्मी आहे. २००३ ते २०१६ या काळात आश्रमशाळांमधील १४१६ विद्यार्थ्यांचा आत्महत्येसह इतर कारणांमुळे मृत्यू झाला. त्यात आठ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, असे विवेक पंडित यांनी सांगितले. मागील तीन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमध्ये २८२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी २८ टक्के मुलांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. सुमारे २३ टक्के मुलांचा गंभीर आजाराने; तर १२.६१ टक्के मुलांचा अचानक मृत्यू झाला. सर्पदंशाने ४.९२ टक्के; तर अपघातांत ४.२९ टक्के मुलांना जीव गमवावा लागला आहे.

ही बातमी वाचली का? भिवंडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे धाव..

मृत विद्यार्थ्यांची नावे 
- प्रियंका अमृत मिसाळ (दहावी, गोंदे आश्रमशाळा, ता. मोखाडा) 
- नीलम महादू कडू (दहावी, कारेगाव आश्रमशाळा,ता. मोखाडा)
- सुनील चंदर खांडवी (नववी, हिरवे आश्रमशाळा, ता. मोखाडा) 
- अंकुश राजाराम काकड (दहावी, मुरबाड आश्रमशाळा,ता. विक्रमगड) 
- नीलेश सुधाकर पारवा (सातवी, मुरबाड आश्रमशाळा,ता. विक्रमगड) 
- हर्षद मधुकर पागी (दहावी, कावळे आश्रमशाळा, ता. विक्रमगड)  
- सोनल रामदास चौधरी (दहावी, साकुर आश्रमशाळा, ता. जव्हार) 
- अश्‍विनी वसंत ठोंबरे (दहावी, गुंज बुधावली आश्रमशाळा,ता. वाडा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight tribal students die in the year in palghar