40 वर्षांनंतर खडसेंचं सीमोल्लंघन, नाथाभाऊंचा राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

सुमित बागुल
Friday, 23 October 2020

एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाआधी जतेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक तब्बल एक तास सुरु होती. 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव, राज्यातील बडे नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलंय. एकनाथ खडसे यांनी भाजप सोबतच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीला सोडचठ्ठी देत आज अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या सुकन्या रोहिणी खडसे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. कोणत्याही पदासाठी नाही तर उत्तर महाराष्ट्रातील प्रलंबित विकास कामांसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं ते म्हणालेत. दरम्यान आता एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये कोणतं पद किंवा कोणती महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाआधी जतेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक तब्बल पाऊण तास सुरु होती. 

का घेतला निर्णय? 

भारतीय जनता पक्षात काम करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्यावर अने बिनबुडाचे आरोप लावले गेलेत. माझं चारित्र्यहनन केलं गेलं असे खडसे यांनी फडणवीसांवर आरोप केलेत. याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे अनेकदा चर्चा केली, मात्र कुणीही त्याची दखल घेतली नाही. म्हणून भाजप पक्षातील केवळ फडणवीसांमुळे आपण भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.  

महत्त्वाची बातमी : खडसेंच्या प्रवेशाआधी राजकीय घडामोडी, जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द : 

एकनाथ खडसे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाडी गावातील. खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 1987 साली एकनाथ खडसे कोठाडी गावचे सरपंच झाले. 1989 साली भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. 1980 साली भाजपामधून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा किल्ला मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ आणि सिंचन ही खाती एकनाथ खडसे यांनी संभाळली. त्यानंतर नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोंबर 2014 या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी तीन जून 2016 रोजी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. खडसेंऐवजी भाजपाने त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना तिकिट दिले. 2019 पर्यंत सलग सहावेळा एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली. त्यांनतर 21 ऑक्टोबर, 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे आणि आज एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश झालाय. 

eknath khadse officially joined nationalist congress party in presence of sharad pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse officially joined nationalist congress party in presence of sharad pawar