Voting From Home : देशाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच 'घरुन मतदान' पर्याय यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voting From Home

Voting From Home : देशाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच 'घरुन मतदान' पर्याय यशस्वी

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रिये अंतर्गत दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यंदाच्या या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या निवडणूक इतिहासात 'घरुन मतदान' हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.

शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत असणाऱ्या व ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत 'घरुनच मतदान' (Voting from Home) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तब्बल ९१ टक्के मतदारांनी हा पर्याय यशस्वीपणे वापरला.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या 'जिल्हा निवडणूक अधिकारी' तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत 'अंधेरी पूर्व' मतदार संघातील ४३० मतदारांनी 'घरुन मतदान' या पर्यायास सहमती दर्शविली होती.

यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी 'घरून मतदान' करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ८० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांची एक स्वतंत्र यादी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तयार करण्यात आली होती. या यादीमध्ये साधारणपणे ७ हजार मतदारांची माहिती होती. या यादीतील सर्व मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा असल्याची माहिती देण्यासह या सुविधेंतर्गत मतदान करावयाचे असल्यास सहमती देण्याचा पर्याय असल्याचे सांगण्यात आले होते.

यानुसार ४३० ज्येष्ठ मतदारांनी 'घरून मतदान' या पर्यायासाठी सहमती नोंदविली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या ३ दिवसांच्या कालावधी दरम्यान 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली ७ व्यक्तींची चमू या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी गेली‌.

घरी पोहचल्यानंतर या चमूद्वारे तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले. या तात्पुरत्या मतदान केंद्रात घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्तीने नाव नोंदविले आहे, त्या व्यक्तीने आपले मत हे 'गुप्त मतदान' पद्धतीने नोंदविले. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.

वरील तपशिलानुसार 'घरून मतदान' या सुवाधेंतर्गत 'अंधेरी पूर्व' मतदार संघातील ज्या ४३० ज्येष्ठ मतदारांनी नाव‌ नोंदविले होते, त्यापैकी ३९२ मतदारांनी घरून मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तब्बल ९१.१६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.