esakal | मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ, भाजपची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ, भाजपची टीका

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ, भाजपची टीका

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: एकीकडे भरमसाठ वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

बेस्ट विद्युत उपक्रमाने मंत्र्यांच्या बंगल्यांना गेले काही महिने वीजबिले न पाठविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 15 मंत्र्यांच्या बंगल्यांसह एकूण 17 शासकीय बंगल्यांना बेस्टने गेले चार-पाच महिने वीजबिले पाठवली नाहीत. दादा भुसे, हसन मुश्रीफ, अमित देशमुख, के. सी. पडवी, संजय राठोड हे मंत्री तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्या बंगल्यांना गेले पाच महिने बील पाठवले नाही. तर जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय  वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब यांच्या बंगल्यांना चार महिने बिल पाठवले नाही, असे  नुकतेच अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात उघड केले आहे.   

या प्रकारावर दरेकर यांनी वरीलप्रमाणे टीका केली आहे. सर्वसामान्य ग्राहक भरमसाठ वीज बिलाने त्रासलेला आहे, आधीच आर्थिक विवंचनेमुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. अशा वेळेला सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारे बेस्ट उपक्रम आपल्याच पक्षाच्या बड्या मंत्र्यांची पाठराखण करत असल्याचे दिसून येत आहे, असाही टोला दरेकर यांनी लगावला आहे.

अधिक वाचाः सीईटीच्या पीसीबी ग्रुपचे हॉलतिकीट देण्यास सुरुवात; असे मिळणार हॉलतिकिट
 

ही शिवसनेची मजबुरी आहे का?

गेली २५ ते ३० वर्षे भाजपसोबत युती करुनच शिवसेनेचे राजकारण सुरु होते ही त्यांची मजबुरी होती का, असा प्रश्नही दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला आहे. अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडल्याबाबत प्रतिक्रिया देताना ते मजबुरीने बाहेर पडले, किंबहुना आम्ही देखील मजबुरीनेच एनडीएमधून बाहेर पडलो, असेही वक्तव्य  राऊत यांनी केले होते. त्या वक्तव्याचा दरेकर यांनी समाचार घेतला आहे. 

गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत शिवसेना भाजपबरोबर सत्तेसाठीच होती का, अन्य कोणी शिवसेनेला उभेही करत नसल्याने भाजप बरोबर सेना आली होती का, की हिंदुत्व आणि राष्ट्रवादीच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर शिवसेना होती, या प्रश्नांची उत्तरे संजय राऊत यांना द्यावी लागतील. सेना-भाजपने विधानसभा निवडणुक युती करून लढली होती. म्हणजे नैसर्गिक युती ही भाजपा बरोबर असताना त्यांना बाजूला ठेवून महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का, याचे उत्तरही संजय राऊत यांनी द्यावे. गेल्या काही महिन्यांत राऊत यांनी वेगवेगळी उलटसुलट वक्तव्ये केली आहेत. पण सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असेही दरेकर म्हणाले.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Electricity bill discount for ministers bungalows BJP criticism