मुंबई बुधवारपासून अंधारात जाणार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

बेस्टच्या संकटात आणखी वाढ
बेस्ट उपक्रमाचा तोटा गेल्या काही वर्षांमध्ये वाढू लागला आहे. यामुळे उपक्रमाचे आर्थिक गणित विस्कळित झाले आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर आली आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत. याविरोधात कामगार संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम देणेही बेस्टला शक्‍य झालेले नाही. आर्थिक समस्येमुळे बेजार झालेल्या बेस्ट उपक्रमाच्या संकटात या नोटिसीमुळे आणखी भर पडणार आहे.

रक्कम थकवल्याने टाटा पॉवरचा बेस्टला वीज विक्री थांबवण्याचा इशारा
मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. २१) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे. यामुळे मंगळवार मध्यरात्रीपासून शहरातील काही भाग अंधारात बुडण्याची भीती आहे.

शहरात बेस्ट उपक्रमामार्फत वीजपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करण्यात येते. वीज खरेदीबाबत टाटा आणि बेस्टमध्ये करार झाला आहे. बेस्ट उपक्रमाने डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत केलेल्या वीज खरेदीचे पैसे टाटा वीज कंपनीला दिलेले नाहीत. ही रक्‍कम तब्बल ५६१ कोटी ५८ लाख रुपये आहे. काही महिन्यांपासून बेस्टकडून पैसे देण्यात येत नसल्याने टाटाने २१ मे रोजी मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमाला विजेची विक्री करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निर्माण होणाऱ्या परिस्थितीस टाटा वीज कंपनी जबाबदार नसेल, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Stop Mumbai Darkness Tata Power Best Bill Arrears