'आपण काहीही गमावलेले नाही, आपण सर्वांनी खूप काही मिळवलं आहे'; इरफान खानच्या पत्नीचे भावनिक पत्र

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 1 May 2020

इरफानच्या पत्नीने एक भावूक पत्र शेअर केले आहे. त्यांनी सांगितले की, हे पत्र इरफानच्या संपूर्ण परिवाराकडून आहे.

मुंबई : ५३ वर्षीय बॉलिवूड अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो कर्करोग या आजाराशी झूंज देत होता. बुधवारी (ता. २९) त्याने मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण चित्रपटसृष्टीने इरफानच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान आणि दुःख होते ते त्याच्या कुटुंबाला. या कठीण परिस्थितीचा त्रास इरफान खानची पत्नी सूतापा सिकंदरला देखील होत आहे. पण इरफानच्या पत्नीने सांगितले आहे की ती तिच्या पती प्रमाणेच हिम्मतवाली आहे. नुकतेच सूतापा यांनी एक भावूक पत्र शेअर केले आहे. त्यांनी सांगितले की, हे पत्र इरफानच्या संपूर्ण परिवाराकडून आहे.

या पत्रात सूतापा म्हणाल्या की, 'मी हे पत्र संपूर्ण कुटुंबीयांकडून कसं लिहू शकते. जिथे संपूर्ण जग या दुःखाला आपलं मानून त्यांचं नुकसान झाल्यासारखेच मानत आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी स्वतःला इथे एकट कसं समजू जिथे लाखो लोक या दु:खामध्ये सहभागी आहेत. मी सर्वांना एवढंच सांगेन की, हे आपण सर्वांनी काहीही गमावलेले नाही, आपण सर्वांनी खूप काही मिळवलं आहे. आणि हे तोच आपल्याला शिकवून गेला आहे. मी अशा काही गोष्टी सांगू इच्छिते की, त्या आजपर्यंत तुम्हा सर्वांना माहिती नसाव्यात. इरफानच्याच शब्दात सांगायचे झाले तर 'हे जादुई आहे'.

पुढे त्या म्हणाल्या, 'माझी त्याच्याकडे एकच तक्रार आहे की, त्याने मला आयुष्यभरासाठी बिघडवले आहे. याच्या परफेक्शनची ओढ अशी होती की, ती मला आता सामान्य गोष्टीत सेटल होऊ देत नाही. एक प्रकारची लय होती ती त्याला प्रत्येक गोष्टीत दिसायची. विशेष म्हणजे आमचं आयुष्य एक अभिनयाचा मास्टर क्लास होता. आणि जेव्हा नको असलेल्या पाहुण्यांनी त्याच्या शरीरात एन्ट्री केली, तेव्हा आम्ही खूप काही गोष्टी शिकलो. डॉक्टर्सचे रिपोर्ट्स मला एक लांबलचक स्क्रिप्टसारखे वाटायचे. ज्यामध्ये मला सगळं काही परफेक्ट असेल असं नेहमी वाटायचं. या दरम्यान अनेकांची आम्हाला साथ लाभली. ही संपूर्ण जर्नी किती छान, सुंदर, वेदनादायी, थरारक होती हे शब्दात सांगणं फार कठीण आहे. मला वाटतं की या मागील अडीच वर्षांची एक सुरवात होती. त्यांचा मध्यांतर होता आणि त्याचाच एक शेवट होता. ज्यामध्ये इरफान एक ऑर्केस्ट्रा वाजवणाऱ्याच्या भूमिकेत होते.'

त्यांच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना सूतापा म्हणाल्या, 'आमची 35 वर्षांची साथ तुटली. याला फक्त एक लग्न म्हणता येणार नाही, ही एक प्रकारची जवळीक होती. माझ्या या छोट्याश्या कुटुंबाला मी एका होडीवर पाहते. ज्यावर आमची दोन मुलं आयान आणि बाबिल देखील आहेत. आणि इरफान त्यांना आयुष्याचा मार्ग दाखवत आहेत. त्यानंतर जाणवतं आयुष्य हे चित्रपट नाही जिथे आपण रिटेक्स घेऊ शकू. मला मनापासून वाटत की, माझी मुले त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनावर लक्ष देतील आणि त्या मार्गावर पुढे चालत राहतील. मी माझ्या मुलांना सांगितले आहे की, इरफानच्या आठवणींना आणि मार्गदर्शनाला एकत्र साठवून ठेवा.'
अशाप्रकारे सुतापा यांनी ही आपलं दुःख या पत्रात व्यक्त केले आहे. जे वाचून इरफानच्या चाहत्यांना अश्रू अनावर होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emotional letter from Irrfan Khan's wife