मुंबईतील गुन्हेगारीवर बसणार वचक; चकमक फेम सचिन वाझेंची झाली 'इथे' नियुक्ती....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

सेवेत समाविष्ठ करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच वाझे यांची बदली सशस्त्र दलातून गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वाझे यांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई ः 1990 मध्ये पोलिस सेवेत दाखल झालेल्या आणि आपल्या कारकिर्दीत 63 गुंडांना यमसदनी धाडलेल्या चकमक सचिन वाझे यांनी गडचिरोलीतून आपल्या सेवेला सुरुवात केली होती. ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे ते प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनुसच्या कोठडीतील संशयित मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह 14  पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता वाझे यांच्यासह इतर विविध प्रकरणांमध्ये निलंबीत 18 पोलिसांना नुकतेच सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

वाचा  ः मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात

सेवेत समाविष्ठ करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच वाझे यांची बदली सशस्त्र दलातून गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वाझे यांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पुनर्विलोकन बैठकीत 113  निलंबित पोलिसांच्या निलंबनावर चर्चा झाली. त्यातील 95  पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आलेले नव्हते. ज्या पोलिसांवर विरोधात गंभीर आरोप आहे, तसेच त्यांच्याविरोधात चौकशी अद्याप सुरू आहेत, अशा पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यातील तीन पोलिसांचे निलंबन पोलिस संचालक कार्यालयामार्फत करण्यात आले होते. तसेच ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर आरोप नाहीत, अथवा प्रशासकीय कारणांमुळे ज्यांचे निलंबन झाले आहे, अथवा प्रशासकीय विलंबामुळे ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तसेच ज्यांच्यावरील चौकशी संपून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत शुक्रवारी पुनर्विलोकन बैठक पार पडली. 

वाचा ः धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन...

त्यात या सर्व अधिका्री व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यात आली व ज्यांना शक्य आहे. अशांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, निलंबन मागे घेण्यात आलेल्या सर्व अधिकार व कर्मचाऱ्यांना कमी महत्त्वाच्या विभागात बदली करण्यात आली होती. त्यानुसार चकमक फेम वाझे यांची सशस्त्र पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वाझे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

वाचा ः सोनू सूद आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' रात्री मातोश्रीवर काय झाली होती चर्चा? वाचा...

अखेर ते पाच पोलिसही कार्यमुक्त
मुंबईच्या सशस्त्र पोलिस दलात कार्यरत असलेल्या काही कर्तबदार पोलिसांची ही दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली होती. त्यातील पाच अधिकारी  पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ, संतोष भालेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विल्सन राँड्रिक्स, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपाली पाटील आणि अश्विनी कोळी यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ते आता दहशतवादी विरोधी पथकात बदली झालेल्या ठिकाणी कार्यभार स्वीकारू शकतील. माजी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना न जुमानता 12 अधिकाऱ्यांनी परस्पर दहशतवादविरोधी पथक (एटीएस)मध्ये जाण्यासाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केला होता. त्यावर शिस्त भंगाची कारवाई म्हणून बर्वे यांनी त्या 12 अधिकाऱ्यांचे आगामी वार्षिक वेतन 1 वर्षासाठी रोखण्यात यावे, याबाबत नोटीस बजावली होती. मात्र बर्वेंच्या निवृत्तीनंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दुसऱ्याच दिवशी या कारवाईला स्थगिती दिली होती. या पाच अधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: encounter specialist sachin waze transfered to crime branch