esakal | नोकरीचे आमिष दाखवून अभियंत्याची हत्या; अल्पवयीन मुलासह 3 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Murderer Arrested

नोकरीचे आमिष दाखवून अभियंत्याची हत्या; अल्पवयीन मुलासह 3 जण अटक

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - नोकरी लावण्याचे आमिष दाखवित डोंबिवलीतील अभियंत्यास चौघांनी मारहाण व लूटमार करीत खंबाळपाडा परिसरात फेकून दिले होते. उपचार दरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तीन दिवसांत मानपाडा पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. रिहान शेख (वय 21), सागर पोनाला (वय 20), सुमित सोनवणे (वय 20) अशी अटक आरोपींची नावे असून त्यात एक अल्पवयीन आरोपी असल्याची महिती पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

कल्याण पूर्वेत राहणारे कृष्णमोहन तिवारी (वय 47) हे शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत शहर विभागाचे पोलीस हवालदार बी. होरे यांना आढळुन आले होते. त्यांनी जखमी तिवारी याला उपचारासाठी शिवम रुग्णालयात दाखल केले. त्याच्या हातावर व डोक्यावर जबर मारहाण करण्यात आली होती. त्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सोमवारी उपचारा दरम्यान तिवारी याचा मृत्यू झाला. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अविनाश वणवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, पोलीस नाईक यलप्पा पाटील व संतोष चौधरी यांच्या पथकाने मंगळवारी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यात एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघा आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

रिहान हा दिवा येथील प्लेसमेंट मध्ये काम करीत होता. त्याच्याकडे उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी कृष्णमोहन याला नोकरीचे आमिष दाखवून बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्याकडील किमती वस्तू लूटमार करीत काढून घेण्याचा चौघांनी प्रयत्न केला. यावेळी कृष्णमोहन यांनी त्यांना विरोध केला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व त्यानंतर त्याला रिक्षातून खंबाळपाडा येथे टाकून दिले.

loading image
go to top