पत्रा चाळ 1034 कोटींचा SRA गैरव्यवहार; HDIL च्या सारंग वाधवानला अटक

अनिश पाटील
Tuesday, 15 September 2020

तुरुंगातून घेतला आर्थिक गुन्हे शाखेने ताबा

मुंबई : गोरेगाव सिद्धार्थ नगरमधील पत्रा चाळ पुनर्विकासात गैरव्यवहार केल्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लि. चे म्हणजेच HDILचे सारंग वाधवान यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. 1034 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने वाधवान यांचा तुरुंगातून ताबाय घेतला आहे.

म्हाडाच्या तक्रारीवरून 2018 मध्ये एचडीआयएलशी संबंधीत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. पंबाज अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेतील 6337 कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ऑक्टोबर 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे वाधवान सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणी चौकशीसाठी वाधवान याला अटक करण्यात आले असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

महत्त्वाची बातमी - मुंबईकर! तुमचं मुंबई- ठाण्यात घरं घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार, वाचा ही आनंदाची बातमी

गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि.च्या संचालकांपैकी एक वाधवान होता. या कंपनीने 2006 मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. 668 रहिवाशांना वाऱ्यावर सोडत विकासकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. 2011 मध्ये या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली.

म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम 120(ब), 409,420 अंतर्गत मार्च 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका संचालकाला यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून गैरव्यवहाराचा आकडा 2 हजार कोटींपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

sarang wadhwan under arrest under SRA scam of patra chawl read breaking news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EOW arrest sarang wadhwan under SRA scam of patra chawl read breaking news