जीवनात यशा सोबत अपयशही तितकेच महत्त्वाचे; तेजश्री प्रधान

जीवनात यशा सोबत अपयशही तितकेच महत्त्वाचे; तेजश्री प्रधान

ठाणे : क्षेत्र तुमचे कोणतेही असो, परंतू त्यामध्ये यश मिळविण्यासाठी वाचन करा, मेहनत घ्या, शिक्षणाला पर्याय नाही. शिक्षण आणि ज्ञान हे शाश्वत आहे. जीवनात यशा सोबतच अपयशही तितकेच महत्त्वाचे आहे. अपयश माणसाला खंबीर करते असे मत प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ठाणे येथे आयोजित रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले. 
रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानच्यावतीने सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचा समारोप बुधवारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या मुलाखतीने झाला. निवेदीका नंदिनी गोरे यांनी प्रधान यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. तेजश्रीने तिच्या कलाक्षेत्रातील कारकिर्दीचा प्रवास यावेळी उलगडला. 

अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करताना मला आई-वडीलांचा पाठिंबा मिळाला. सुरवातील चुका घडत गेल्या, मात्र शिकत गेले. या सगळ्या प्रवासात माझी चंचल वृत्तीची जागा संयमाने घेतली. आता भूमिकांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते. प्रामाणिकपणे कष्ट करते असे तीने सांगितले. समाजमाध्यमावर कलाकार अनेक जणांसोबत जोडलेले असतात. विशेषतः तरूणाई आम्हा कलाकारांना आदर्श मानत असते. कलाकार म्हणून आम्ही या समाजाचे प्रतिनिधित्व करत असतो.

त्यामुळे मी माझ्याकडून काही ना काही प्रबोधनात्मक या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न करते. यामुळे म्हाळगी व्याख्यानमालेतही मी आवर्जुन सहभागी झाले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे खूप पर्याय तरुणाईसमोर उपलब्ध आहेत. अनेक गोष्टी शॉर्टकटने आणि रेडिमेड मिळाल्या तर यश मिळते. परंतू त्यातून तुम्ही समृद्ध होत नाहीत असे तरूणाईच्या आजच्या वृत्तीवर त्यांनी चपखल भाष्य केले. मी शाळेत असतांना मला आईने शिवाजी सावंत यांची मृत्यूंजय कादंबरी वाचायला दिली. मी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर चार वेळा ही कादंबरी वाचली, त्यामुळे आपली बौध्दीक पातळी वाचनातून पडताळून पाहता येते. असा स्वानुभव त्यांनी सांगितला. 

मराठी भाषेत विपूल साहित्य 
मराठी भाषेविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, आपल्या मराठी साहित्यिकांनी आजन्म पुरून उरेल एवढी साहित्य निर्मिती केली आहे. वसंत कानेटकर, विजय तेंडूलकर, वसंत सबनीस यासारख्या आणि अन्य साहित्यिकांनी लिहलेली नाटके वाचताना त्यांची लेखनातील दुरदृष्टी आणि दृष्टीकोन आजच्या काळालाही लागू होतो. वसंत सबनीस यांनी लिहलेल्या कार्टी काळजात घुसली हे नाटक करतांना मला त्याची प्रचिती आली. हे नाटक रंगमंचावर आणणारी आमचा तिसरा संच होता. त्या नाटकातील विचार आजही ताजे आहेत, त्यामुळे त्यात आम्ही बदल केले नाहीत, असे त्यांनी नमूद केले. 

नाटक हे सर्वमाध्यमात वरचे 
चित्रपट आणि मालिकांच्या जगात काम करतांना रिटेक मुळे एखादी गोष्ट चुकली तर दुरूस्त करता येते. मात्र नाटक हे सर्व माध्यमात वरचे माध्यम आहे. या माध्यमात काम करतांना रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद तुमच्या अभिनयात असली पाहिजे. मी अभिनयात तेवढी सक्षम झाल्यानंतरच मी नाटक या माध्यमाकडे वळाल्याचे तिने यावेळी सांगितले. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com